माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी
कुख्यात गुंड फिरोज मेंटलची वालधुनी परिसरात दहशत
कल्याण, ता. २० (वार्ताहर): वालधुनी परिसरात कुख्यात गुंड फिरोज खान उर्फ फिरोज मेंटल आणि त्याचा साथीदार तौसिफ सय्यद यांची दहशत निर्माण झाली आहे. याच गुंडगिरीविरोधात तक्रार केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात माजी नगरसेवक चव्हाण यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिरोज मेंटल हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी विश्वातील ओळखला जाणारा गुंड आहे. त्याच्यावर बलात्कार, अपहरण, खंडणी, हत्या अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तरीही तो आणि त्याचे साथीदार मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. या घटनेनंतर महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पथक सक्रिय झाले असून, फिरोज मेंटल आणि तौसीफ सय्यद यांच्या शोधासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या दोघांच्या तातडीने अटकेची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.