Rahul Gandhi : 'राहुलजी! लवकर लग्न करा... आम्ही मिठाईच्या ऑर्डरची वाट पाहतोय'; राहुल गांधींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
esakal October 22, 2025 08:45 AM

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी दिवाळीच्या निमित्ताने जुन्या दिल्लीतील ऐतिहासिक घंटेवाला मिठाई दुकानात पोहोचले. त्यांनी येथे दिवाळीच्या शुभेच्छा देत देशवासीयांना आनंदाचा संदेश दिला. इतकेच नव्हे, तर त्यांनी स्वतः इमरती आणि बेसनाचे लाडू बनवण्याचाही प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या लग्नावर आधारित एक मजेदार प्रसंग घडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

'राहुलजी! लवकर लग्न करा…'

घंटेवाला दुकानाचे मालक सुशांत जैन राहुल गांधींना पाहून अतिशय आनंदित झाले. त्यांनी हसत म्हणाले, “तुमच्या लग्नाच्या मिठाईची ऑर्डर आम्ही घेणार आहोत; पण त्यासाठी तुम्ही लवकर लग्न करा.” हे ऐकून राहुल गांधीही हसले आणि वातावरण हलकंफुलकं बनलं.

राहुल गांधींच्या साधेपणाचं कौतुक

या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर विनोदी कमेंट्स केल्या असून काहींनी राहुल गांधींच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.

दुकानात बेसन लाडू बनवण्याचा प्रयत्न

राहुल गांधींनी X (ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, “दिवाळीचा खरा गोडवा केवळ थाळीमध्ये (ताट) नाही, तर नातेसंबंध आणि समुदायात आहे.” दरम्यान, राहुल गांधींनी जुन्या दिल्लीतील ऐतिहासिक घंटेवाला दुकानात इमरती आणि बेसन लाडू बनवण्याचाही प्रयत्न केला, आणि या दुकानाचा गोडवा अजूनही तसाच शुद्ध, पारंपरिक आणि हृदयस्पर्शी असल्याचंही ते म्हणाले.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सुशांत जैन यांनी सांगितलं, की त्यांनी राहुल गांधींची आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना मिठाई पुरवली आहे. ते म्हणाले, “आता राहुलजींच्या लग्नाची मिठाई देण्याची आमची वेळ आली आहे.” ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकांनी राहुल गांधींच्या या साधेपणाचं कौतुक केलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.