Teacher Recruitment : डीएड-बीएडधारकांसाठी सुवर्णसंधी! राज्यात १८ हजार शिक्षकांची होणार भरती; 'या' तारखेला 'टीईटी' परीक्षा
esakal October 22, 2025 10:45 AM

बेळगाव : राज्यात १८ हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सात डिसेंबरला ‘टीईटी’ परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेसाठी डीएड व बीएडधारकांना ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे (Karnataka Government) देण्यात आली आहे.

शिक्षण खात्याने राज्यात पुन्हा नव्याने शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डीएड आणि बीएड धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांनी २३ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करावेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Rahul Gandhi : 'राहुलजी! लवकर लग्न करा... आम्ही मिठाईच्या ऑर्डरची वाट पाहतोय'; राहुल गांधींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे वर्ष २०२२ मध्ये शिक्षण खात्यातर्फे राज्यात १५००० शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली होती; मात्र शिक्षक भरतीसाठी टीईटी आणि सीईटी घेण्यात आल्यानंतर राज्यात १३३५२ शिक्षक परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यानंतर पात्र शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले होते. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल झाले होते. तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सात डिसेंबरला सकाळच्या सत्रात इयत्ता पहिली ते पाचवीसाठी, तर दुपारच्या सत्रात सहावी ते आठवीसाठी टीईटी घेण्यात येणार आहे. सामान्य आणि ओबीसी वर्गातील परीक्षार्थींना परीक्षेसाठी सातशे रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना हजार रुपये भरावे लागणार आहेत, तर अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना एका परीक्षेसाठी ३५०, तर दोन्ही परीक्षांसाठी पाचशे रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची नोंद घेऊन शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार आपले अर्ज दाखल करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच अर्ज दाखल करताना परीक्षार्थ्यांना प्रवेश शुल्क भरावे लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.