जपानच्या संसदेने सनेई तकाईची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.
64 वर्षांच्या तकाईची या उजव्या विचारसरणीच्या नेत्या असून त्यांना जपानची 'आयर्न लेडी' म्हणून ओळखले जाते. पंतप्रधानपदासाठी हा त्यांचा तिसरा प्रयत्न होता.
वरच्या सभागृहानेही तकाईची यांची जपानच्या पुढील पंतप्रधानपदी निवड केली असून, त्यांच्या पदग्रहणाचा मार्ग निश्चित झाला आहे.
वरच्या सभागृहात त्यांना 125 मतं मिळाली, म्हणजे साध्या बहुमतासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा एक मत अधिक मिळाले.
याआधी, कनिष्ठ सभागृहात त्यांना 237 मते मिळाली होती, आवश्यक बहुमताचा आकडा 233 होता. त्यामुळे त्यांचं पद निश्चित झालं होतं.
तकाइची सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी)च्या सदस्य आहेत. एलडीपीने गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा नवीन पंतप्रधान निवडला आहे.
या पक्षावर अलीकडच्या काळात अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपांचे सावट आहे.
माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्या याआधी मंत्री म्हणून काम पाहत होत्या. एकेकाळी त्या टीव्ही होस्ट आणि हेवी मेटल ड्रमरही होत्या.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तकाइची यांचं कौतुक करताना त्यांना "अतिशय सन्माननीय आणि बुद्धिमान नेत्या" म्हटलं होतं.
तकाईची आता जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या असल्या, तरी देशातील काही तरुण महिलांना वाटतं की, त्या महिलांच्या हक्कांसाठी फारसा काही बदल घडवून आणणार नाहीत.
तकाईची यांनी यापूर्वी पुरुषप्रधान वारसाहक्काला पाठिंबा दर्शवला आहे. त्या विवाहित महिलांनी मूळ आडनाव ठेवण्याच्या विरोधात आहेत आणि समलिंगी विवाहालाही विरोध करतात.
21 वर्षांची आयदा ओगुरा म्हणते, "तकाईची पंतप्रधान झाल्याच्या बातमीवर जपानबाहेरील लोकांनी कसा प्रतिसाद दिला हे पाहणं माझ्यासाठी 'इंटरेस्टिंग' होतं.
सगळे म्हणत होते, 'वा, जपानच्या इतिहासात पहिल्या महिला पंतप्रधान! महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेसाठी ही मोठी संधी!' पण मला वाटतं ही फारच भोळी समजूत आहे.
तुम्ही त्यांच्या राजकीय विचारसरणीकडे आणि त्या काय प्रतिनिधित्व करतात याकडे पाहिलं, तर लक्षात येईल की, त्यांचे विचार पारंपरिक आहेत आणि संरचनात्मक बदल घडवण्याऐवजी त्या पितृसत्ताक व्यवस्थेला अधिक बळकट करतात."
ट्रम्प यांच्याशी संबंधया महिन्याच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी तकाईची यांना त्यांच्या पक्षाच्या म्हणजेच एलडीपीच्या नेतृत्वाच्या शर्यतीत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन दिलं आणि त्यांच्या विजयानं "अतिशय आनंददायक बातमी" असल्याचं म्हटलं.
ट्रम्प यांनी त्यांचं वर्णन "अत्यंत आदरणीय, बुद्धिमान आणि ताकदवान व्यक्ती" असं केलं आणि जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं.
त्याच्या प्रतिसादात, तकाईची यांनी पोस्ट करून सांगितलं की त्या ट्रम्प यांच्या मेसेजमुळे "अत्यंत आनंदी" आहेत. "आपल्या युतीला अधिक मजबूत आणि समृद्ध बनवण्यासाठी [त्यांच्यासोबत] काम करण्याची," आशा त्यांनी व्यक्त केली.
आतापर्यंत तकाईची यांनी स्वतःला अमेरिकेच्या विश्वासार्ह असल्याचं दाखवून दिलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं की, ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या गुंतवणूक कराराचा त्या सन्मान करतील.
याआधी त्याबाबत संमिश्र संकेत दिले गेले होते. पण या भूमिकेमुळं त्या द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दर्शवतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.