पिंपरी, ता. २१ : शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर संयम हरवणाऱ्या वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एका वाहनाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक केला, दुसऱ्या वाहनाचा थोडा धक्का लागला, पुढे जाण्यासाठी रस्ता दिला नाही, अशा किरकोळ कारणांवरून दोन वाहनचालकांमध्ये रस्त्यातच वाद होण्याचे प्रकार वाढत आहेत. एक वाहन चालक वाहतुकीच्या रस्त्यावरच दुसऱ्या वाहनासमोर आपले वाहन उभे करतो. आपल्या वाहनांमुळे सर्व वाहतुकीचा खोळंबा होतोय, याचे भानही त्या वाहन चालकांना राहत नाही. परिणामी, काही काळ त्या परिसरातील वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडतो. असे प्रसंग शहरातील विविध मार्गांवर पाहायला मिळतात.
रस्त्याने जाताना प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई असते, दरम्यान, एका छोट्या अपघाताच्या किरकोळ कारणावरून दोन्ही चालक रस्त्यातच वाहने आडवी लावून एकमेकांवर आरडाओरडा करतात. एकमेकांची गचांडी पकडण्यापर्यंत काहींची मजल जाते. यामुळे वाद निर्माण होऊन रस्त्यात वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीत प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. नोकरदार, शाळकरी मुले व इतर नागरिक वाहतूक कोंडीत अडकून पडतात.
दरम्यान, असे प्रकार टाळण्यासाठी रस्त्याने जाणारा एखादा वाहन चालक चुकीचा वागत असल्यास अथवा अपघात झाल्यास पोलिसांना तत्काळ कल्पना देणे आवश्यक आहे. पोलिसांकडून रीतसर कारवाई केली जाते. मात्र, अशावेळी वाहन चालकाने संयमाची भूमिका न घेतल्यास वाद वाढत जातो. असे प्रकार शहरातील विविध मार्गांवर वेळोवेळी घडत असतात.
या महिन्यातील काही घटना
- निगडीहून तळवडेकडे जाताना वाहन ओलांडण्याच्या कारणावरून दोन वाहन चालकांमध्ये रस्त्यातच वाद
- देहूरोडहून देहूकडे येताना वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन वाहन चालकांच भांडण; रस्त्यात वाहतूक कोंडी
---------------------------------
मोटारीने तळेगावहून चाकणच्या दिशेने जात असताना एका दुचाकीचा दुसऱ्या मोटारीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन्ही वाहन चालकांमध्ये वाद झाला. दोन्ही वाहने रस्त्यात उभी करून ते भांडत होते. यामुळे माझ्यासह इतरही वाहने खूप वेळ या मार्गावर अडकून पडली.
- रवी खेडकर, वाहन चालक
वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालविणे आवश्यक आहे. दरम्यान, रस्त्यात अपघातासारखी एखादी घटना घडल्यास रस्त्यात वाद न घालता कायदा हातात घेवू नये. तसेच इतर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे वर्तन करू नये. संबंधित वाहन चालकाबाबत काही तक्रार असल्यास पोलिसांकडे तक्रार करावी, अन्यथा कायद्याचे उल्लंघन करून चुकीचे वर्तन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होवू शकते.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा