‘हटरी’ दिव्याने झळाळले उल्हासनगर
सिंधी बांधवांची पारंपरिक दिवाळी!
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २० : उल्हासनगरच्या दिवाळीला खास ओळख देणारा ''हटरी दिवा'' सिंधी संस्कृतीचा जिवंत वारसा मानला जातो. या दिव्याच्या प्रकाशात केवळ दिवाळीच उजळत नाही, तर सिंधी समाजाची श्रद्धा, परंपरा आणि व्यवसायिक संस्कृतीही झळाळून निघते. मातीचा गोल तळ, तीन बांबूंच्या काड्या, रंगीत पताका आणि त्यावर तेजोमय दिवा असलेली ''हटरी'' सिंधी समाजाच्या ‘लक्ष्मीपूजेची आत्मा’ आहे. दिवाळीत ती त्यांच्या घराघरांत, दुकानांत आणि मनांत प्रकाश फुलवते.
दिवाळीचा काळ म्हणजे प्रकाशाचा उत्सव, मात्र उल्हासनगरातील सिंधी समाजासाठी हा उत्सव केवळ रोषणाईचा नसून, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक एकतेचा प्रतीक आहे. येथे सिंधी बांधव दिवाळी साजरी करताना ‘हटरी’ दिव्याचा विशेष सन्मान करतात. हा दिवा म्हणजे त्यांच्या परंपरेचा वारसा असून, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तो विशेष भावपूर्वक पूजला जातो.
हटरी तयार करण्याची पद्धत अत्यंत कलात्मक असते. मातीचा गोल आकार घेऊन त्यावर तीन बांबूच्या काड्या एकत्र बांधल्या जातात. त्या त्रिकोणावर छोटासा मातीचा दिवा बसवला जातो. नंतर या दिव्याला विविधरंगी रंग, कागदी पताका, झिलमिल रिबनी आणि सजावटी वस्तू लावून तो मोहक बनवला जातो. लक्ष्मीपूजनाच्या रात्री याच हटरीला ‘दुकान’ किंवा ‘व्यवसाय’ याचे प्रतीक म्हणून पूजले जाते. कारण सिंधी समाज जगभरात त्यांच्या उद्योगशीलतेसाठी आणि प्रगतिशील व्यापार परंपरेसाठी प्रसिद्ध आहे.
रोजगाराचे साधन
हटरी अनेक कुटुंबांसाठी रोजगाराचेही साधन आहे. गुजरातमधील अहमदाबाद व मेहसाणा भागातील वाघरी समाज दरवर्षी उल्हासनगरमध्ये येऊन हे हटरी दिवे तयार करतो. दीड महिन्यापूर्वीच लहान मुले, पत्नी, आई-वडील यांच्यासह ते उल्हासनगर शहरात दाखल होतात. दिवसभर हाताने दिवे बनवणे, रंगकाम, सजावट हा त्यांचा रोजचा दिनक्रम असतो. रात्र झाली की ते रस्त्याच्या कडेला झोपतात. या दिव्यांना मिळणारा भाव मात्र त्यांच्या मेहनतीला न्याय देणारा नाही. “प्रत्येक हटरीसाठी माती, रंग, बांबू, पताका असा सर्व खर्च येतो, पण ग्राहकांना दर जास्त वाटतात. नफा नाही म्हणून पुढच्या वर्षी येणं शक्य होईल का ठाऊक नाही,” असे एका वाघरी विक्रेत्याने सांगितले.