- rat२०p१०.jpg-
P२५N९९७८९
दापोली ः येथील इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थी आकाश कंदील बनविण्याचे प्रशिक्षण घेताना.
---
दापोलीतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास
आकाशकंदील विक्रीतून उत्पन्न; ३० वर्षांपासून राबविला जातो उपक्रम
राधेश लिंगायत : सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १९ : घराघरात आनंद आणि प्रकाश फुलवणारा दीपावली सण केवळ आनंदाचे प्रतीक नाही, तर स्वावलंबनाचेही धडे देणारा ठरत आहे. दापोली येथील कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदा दीपावलीच्या स्वागतासाठी स्वतःहून आकाशकंदील तयार करून विक्रीसाठी ठेवले आहेत.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला असून, सर्व कंदील ‘ना नफा–ना तोटा’ या तत्त्वावर विकले गेले आहेत. यामधून ६ हजार रुपये जमा झाले असून ही रक्कम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यालयाकडून देण्यात आली. ही शाळा रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव निवासी कर्णबधिर शाळा असून, ती १९८४ साली सुरू झाली. ५ ते १८ वयोगटातील ३० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शासनमान्यता प्राप्त ८वीपर्यंतच्या शिक्षणासोबतच व्यवसाय शिक्षणावरही येथे विशेष भर दिला जातो.
आकाशकंदील तयार करण्याचा उपक्रम गेली ३० वर्षे सुरू असून, यावर्षी विद्यार्थ्यांनी ३०० विविध आकार व रंगसंगतीचे कंदील तयार करून विक्रीचा नवा उच्चांक गाठला. याशिवाय, शिवणकाम, मातीकाम, भरतकाम, फिनेल बनविणे, कागदी व कापडी पिशव्या, पायपुसणी, फुले, मेणबत्त्या बनविणे, नागपंचमीसाठी नागोबाची मूर्ती तयार करणे असे हंगामी व्यवसायही विद्यार्थ्यांना शिकवले जातात. अपंगत्वावर मात करून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचे ध्येय ‘स्नेहदीप संस्थे’ने ठेवले आहे आणि त्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. या उपक्रमासाठी विशेष शिक्षक सूर्यकांत खेडेकर, श्री. राठोड, मुख्याध्यापक मनोहर जालगावकर व अध्यक्षा स्मिता रमेश सुर्वे यांचे मोलाचे योगदान आहे.
चौकट
कला, क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी
कर्णबधिर शाळेतील विद्यार्थी केवळ व्यवसायातच नव्हे, तर क्रीडा व कलाक्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. चेतन पाशिलकर या विद्यार्थ्याने दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, यामुळे शाळा, गाव आणि देशाचा गौरव झाला आहे.
--------
कोट
विद्यार्थ्यांनी मेहनतीने बनवलेले आकाशकंदील बाजारात न नेता नागरिकांनी शाळेत येऊन खरेदी केले आहेत. हीच खरी आमची दिवाळी आहे.
– स्मिता सुर्वे, अध्यक्षा