उद्या दिवाळी पाडवा
पहाट कार्यक्रम
रत्नागिरी ः दिवाळी पाडव्याच्या मंगलमय आणि आनंददायी वातावरणात दिवाळी पाडवा पहाट ही स्वरमैफल स्वरसंध्या परिवार व रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली आहे. २२ रोजी सकाळी ७.३० वाजता, जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीतील पहिला मजला, खोली क्रमांक २०६ येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अर्णव सरपोतदार, वैष्णवी कोपरकर, रुद्रानी मुळे, सावनी सरपोतदार, स्वराली सुर्वे आदी बाल कलाकार आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली मुळे-दामले करणार असून, तबला वादन केदार लिंगायत, हार्मोनियम साथ श्रीरंग जोगळेकर आणि ढोलकीवर कैलास दामले साथसंगत करतील. या स्वरमैफलीचे संगीत संयोजन संध्या सुर्वे यांनी केले आहे. सर्व संगीतप्रेमींनी या दिवाळी पाडवा पहाट मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन बार असोसिएशनचे सचिव ॲड. रत्नदीप चाचले यांनी केले आहे.
बालभारती स्कूलमध्ये
वाचन प्रेरणा दिन
गुहागर : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अंजनवेल येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सुरजित चटर्जी यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच तिसरीमधील विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व या विषयावर नाटिका सादर केली. याप्रसंगी शाळेच्या ग्रंथालय विभागातर्फे विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत वाचनाचे महत्त्व जाणून घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य दिले.