आळंदी, ता. २० : संत ज्ञानेश्वर महाराज माउलींच्या समाधी मंदिराच्या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना गंध लावण्याचे काम करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने पळवले आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणी फिर्याद अंबिका अनिल बिजले (वय ३८, रा. चाळीस फुटी रोड, आळंदी, मळूगाव विष्णूनगर हमालपुरा, नांदेड) यांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील माऊलींच्या मंदिरासमोर या दोन मुली गंध लावण्याचे काम करत असताना गुरुवारी (ता. १६) कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना आई-वडिलांच्या परवानगीशिवाय घेऊन गेला. दोघींचे आधार कार्ड किंवा अन्य पुरावे नाहीत. त्यातील एक दहा वर्षांची, रंग गोरा, अंगावर गुलाबी टॉप व जीन्स पॅन्ट आणि डाव्या गालावरती चट्टा आहे. दुसरी नऊ वर्षांची असून, रंग सावळा, अंगात काळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगिन पॅन्ट, असा पेहराव केलेला आहे. या वर्णनाच्या मुली कोणाला आढळल्यास आळंदी पोलिसांची संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.