'दिवाळी पहाट'साठी जल्लोषमय वातावरण
esakal October 19, 2025 12:45 PM

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ ः दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे शहरात ‘दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक सोहळ्याचे जल्लोषात आयोजन करण्यात येत आहे. मासुंदा तलावाच्या काठावर, राम मारुती रोड परिसर, तसेच शहरातील विविध ठिकाणी राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. दिवाळी फराळ, मिठाई वाटपाबरोबरच विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांतून बक्षिसांमधून मतदारराजाला खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यंदाही शिवसेना (शिंदे गट आणि ठाकरे गट), भाजप आणि अन्य सामाजिक संस्था दिवाळी पहाटनिमित्त संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. सोमवारी (ता. २०) नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेपासून हे कार्यक्रम सुरू होणार असून, ठाणेकरांसाठी हा एक खास सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मासुंदा तलाव, राम मारुती रोड, चिंतामणी चौक, गडकरी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. ध्वनिक्षेपक, बँड आणि डीजे संगीताच्या माध्यमातून दिवाळी पहाट साजरी केली जात असल्याने ठाण्यातील तरुणाईचा या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळणार आहे. शहरात उत्सवाचे व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून, ठाणेकर या कार्यक्रमांतून दिवाळीचा प्रारंभ मोठ्या उत्साहात करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका निवडणूक ३१ जानेवारी २०२६ पूर्वी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. माजी नगरसेवकांसह नवीन इच्छुकही तयारीला लागले आहेत. निवडणूक लढवणार असलेल्या प्रभागांमध्ये दिवाळीनिमित्त विविध स्पर्धात्मक कार्यक्रम होत आहेत. त्यासाठी मोठमोठी बक्षिसे जाहीर केली आहेत.

मोफत सांगीतिक मेजवानी
दिवाळी सण सुरू झाला आहे. या पाच ते सहा दिवसांच्या कालावधीत शहरात विविध संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर दिवाळी पहाटच्या सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांना ठाणेकरांची मोठी गर्दी होते. हीच बाब लक्षात घेऊन महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागामध्ये दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले असून, यातून संगीत क्षेत्रातील गायक, कलाकारांना भेटण्याची संधी मिळत आहे.

प्रमुख आयोजन स्थळे आणि कार्यक्रमांची वैशिष्ट्ये
- मासुंदा तलाव परिसर : राजवंत ज्वेलर्ससमोरील भागात शिवसेना शिंदे गटाकडून एका संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती दरवर्षीप्रमाणे यंदाही अपेक्षित आहे.
- राम मारुती रोड परिसर : भाजपचे पदाधिकारी संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेतर्फे बाळकूम येथील राष्ट्रीय ब्रास बँड वादनाचे आयोजन करण्यात आले आहे.
- चिंतामणी चौक : माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने गायक साजन बेंद्रे आणि डीजे नेश यांच्या सहभागाने कार्यक्रम पार पडणार आहे.
- गडकरी रंगायतन चौक : शिवसेना ठाकरे गट आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. यासाठी पोलिसांची परवानगी मिळाली असली तरी अद्याप अंतिम कार्यक्रमाचे नियोजन ठरवले गेलेले नाही.
- शिवसमर्थ शाळा मैदान : येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक महेश काळे यांचे सादरीकरण होणार आहे.
- ब्रह्मांड परिसर : ब्रह्मांड कट्टा यांच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ आणि ‘ब्रह्मांड युवा पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन केले गेले असून, या ठिकाणी मराठी आणि हिंदी गाण्यांची सुरेल मैफल रंगणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.