पुणे : पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना हजारो रुपयांचा बोनस जमा झाला आहे, कंत्राटी कामगारांनाही पगार वाढवून मिळाला आहे, अशी स्थिती असताना परिमंडळ तीनमधील १६५ कंत्राटी सुरक्षा रक्षकांना बोनस देण्यात आला नाहीच. त्यातील ६५ जणांना वेतनही मिळाले नाही. त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले आहे. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला संपर्क केला तरीही त्याने प्रतिसाद दिला नाही अशी अवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होत नसल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या विविध कार्यालये, मालमत्ता, उद्याने, स्मशानभूमी, मैदाने, तसेच जलशुद्धीकरण केंद्रांवर खासगी सुरक्षा रक्षक तैनात आहेत. या रक्षकांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला वेतन देणे बंधनकारक असून, आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी १० हजार रुपये बोनस देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Pune Crime: 'गुन्हेगारी उदात्तीकरणप्रकरणी नीलेश घायवळवर गुन्हा'; आतापर्यंत सात गुन्हे दाखलसुरक्षा सेवेसाठी महानगरपालिकेने एकूण तीन ठेकेदार कंपन्यांशी करार केला आहे. त्यापैकी क्रिस्टल कंपनीकडे परिमंडळ तीन मधील वारजे-कर्वेनगर, सिंहगड रस्ता आणि धनकवडी-सहकारनगर या तीन क्षेत्रीय कार्यालयाचा समावेश आहे. या तीन क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ठेकेदार कंपनीने १६५ पैकी केवळ १०० सुरक्षा रक्षकांचे नियमीत वेतन दिले आणि बोनस दिलेला नाही. तर उर्वरित ६५ सुरक्षा रक्षकांना १८ ऑक्टोबरपर्यंत पगार तर दिला नाहीच आणि बोनस ही दिलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी करावी कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
“तीनही कंपन्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि बोनस देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यातील दोन कंपन्यांनी त्या अटी पाळल्या, परंतु क्रिस्टल कंपनीने अद्याप वेतन दिलेले नाही. त्यांना मागील दोन दिवसांपासून वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत, पण त्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.”
- राकेश विटकर, मुख्य सुरक्षा अधिकारी, महापालिका
‘‘दिवाळीसाठी घरात सामान खरेदी करायचे आहे. मुलांना कपडे, फटाके घ्यायचे आहेत. पण पगार झालेला नसल्याने दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न पडला आहे?. आमचा पगार लवकरात लवकर करावी अशी मागणी आहे.’’
- एक सुरक्षा रक्षक, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय