Shubman Gill: 'माझ्या जागेवर ते कर्णधार असते, तर त्यांनी...', विराट - रोहितसोबतच्या संबंधांवर कॅप्टन गिल अखेर स्पष्ट बोलला
esakal October 19, 2025 11:45 AM
  • शुभमन गिलने वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबतच्या संबंधांवर स्पष्टता दिली आहे.

  • गिलने सांगितले की, त्यांचे संबंध चांगले आहेत आणि ते दोघेही त्याला सल्ला देतात.

  • गिलने म्हटले की, विराट आणि रोहित यांचे अनुभव संघाला पुढे नेण्यासाठी मदत करतील.

भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेकडे अनेकांचे लक्ष आहे, कारण शुभमन गिल वनडेतील नेतृत्वाची धुरा या मालिकेपासून सांभाळणार आहे.

या मालिकेपूर्वी बीसीसीआयने रोहित शर्माला हटवून शुभमन गिलकडे नेतृत्वाची जबबादारी सोपवली आहे. तथापि, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही अनुभवी खेळाडू या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असून ते ७ महिन्यांनंतर भारतासाठी खेळताना दिसणार आहेत.

IND vs AUS : भारताची डोकेदुखी वाढवणारा फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संघात आला... मागील तीन सामन्यांत केल्यात १३०, १६०, १०५ धावा

दरम्यान, नेतृत्व बदल झाल्यानंतर शुभमन गिलचे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल बरीच चर्चा झाली आहे.

आता याबाबत नवा कर्णधार शुभमन गिलनेच भाष्य केले आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना रविवारी (१९ ऑक्टोबर) पर्थमध्ये खेळायचा आहे. २०२० नंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये वनडे खेळणार आहे.

पहिल्या वनडेच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना गिल म्हणाला, 'मला वाटतं बाहेर वेगळंच बोललं जात आहे, पण आमच्यामध्ये काहीही बदलेलं नाही. पूर्वीप्रमाणेच सर्व सारखंच आहे आणि त्यामुळे खूप फायदा मिळत आहे. त्यांच्या अनुभवावरून, त्यांनी घेतलेल्या शिकवणीतून, त्यांना खेळपट्टीबद्दल आणि कोणत्याही परिस्थितीबद्दल काय वाटतं, हे मी त्यांच्याकडे जाऊन विचारतो. ते माझ्या जागेवर असताना त्यांनी काय केलं असते, हे विचारतो. मला लोकांचे विचार समजून घ्यायला आवडतात आणि मग मी माझ्या विचारांनी निर्णय घेतो.'

गिल पुढे म्हणाला, 'माझे विराट भाई आणि रोहित भाई यांच्याशी चांगले संबंध आहेत. जेव्हाही मला कशाबद्दल शंका असते, तेव्हा मी त्यांच्याकडे जातो. त्यांचे सल्ले घेतो आणि ते देखील कधीही मला काही सांगताना कचरत नाही. हे पाहा मला वाटतं की हीच अनुभवाची कमाई आहे.'

गिल असंही म्हटले की विराट आणि रोहित मर्यादीत षटकांचे सर्वोत्तम खेळाडू असून तो त्यांना लहानपणापासून आदर्श मानत आला आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व करणे ही सन्मानाची गोष्ट असल्याचे त्याने म्हटले. याशिवाय तो म्हणाला, या मालिकेत असे अनेक क्षण येतील, ज्यावेळी त्याला विराट आणि रोहितकडून शिकायला मिळेल आणि गरज असताना त्यांच्याकडून सल्ले मागताना त्याची लाज वाटणार नाही.

IND vs AUS: विराट-रोहितला खेळताना पाहण्याची ऑस्ट्रेलियन्सला शेवटची संधी, पॅट कमिन्सने बोलूनच दाखवलं

कर्णधारपद सांभाळण्याबाबत गिल म्हणाला, 'नक्कीच, खूप उत्साही आहे. एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा वारसा पुढे चालवण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांच्याकडून मला खूप अनुभव आणि शिकायला मिळाले आहे. माझे विराट आणि रोहित यांच्यासोबत खूप वेळा चर्चा झाली आहे की संघाला कसं पुढे न्यायचं आहे आणि के वातावरण त्यांना भारतीय संघात हवे आहे. मला वाटतं त्यांचे अनुभव संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतील.'

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला वनडे सामना रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.