Malvan Fishermen Protest : छोट्या मच्छीमारांच्या पोटावर पाय मच्छीमारांतून संताप, मालवणात मत्स्य अधिकारी धारेवर
esakal October 19, 2025 01:45 PM

Malvan Fish Market : सिंधुदुर्गसह मालवणच्या किनारपट्टी भागात मासेमारी माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. एलईडी आणि बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. प्रशासनाची पूर्णपणे बंदी असताना आणि जिल्ह्यात एकही पर्ससीन एलईडी फिशिंग परवाना अस्तित्वात नसताना ‘माशांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. यामुळे यंदा दिवाळी चांगली जाईल,’ अशा आशेवर असलेल्या छोट्या मच्छीमारांच्या पोटावर थेट पाय ठेवल्याचा आरोप करत येथील मच्छीमारांना मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

अवैधरीत्या सुरू असलेल्या या मासेमारीविरोधात आज मच्छीमार नेते बाबी जोगी यांच्यासह सुजित मोंडकर, वासुदेव कोळंबकर, श्री. तारी, गणपत आडिवडेकर, आना मोंडकर, हेमंत जोशी यांच्यासह अन्य पारंपरिक मच्छीमारांनी येथील मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत जाब विचारला. मागील काही दिवसांपासून समुद्रात बांगडा मासा मुबलक प्रमाणात मिळू लागल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. याच बांगड्याच्या जोरावर यंदाची दिवाळी चांगली जाईल, असे चित्र असताना कायद्याला धाब्यावर बसवून काही ठरावीक लुटारू पर्ससीन आणि एलईडीच्या मदतीने थेट पारंपरिक मच्छीमार जेथे मासेमारी करतात त्याच ठिकाणी येऊन लूटमार करत आहेत.

या अनधिकृत आणि विनाशकारी पद्धतीच्या मासेमारीमुळे समुद्रातील लहान-मोठा सर्व मासा जाळ्यात ओढला जात आहे. मच्छीमारांच्या डोळ्यादेखत माशांची लयलूट होत असताना शासनाचे मत्स्य विभाग याकडे डोळेझाक करत आहे. महिन्यातून एखादी कारवाई करून केवळ कारवाईचा दिखावा केला जात असल्याची संतप्त भावना पारंपरिक मच्छीमारांनी यावेळी व्यक्त केली.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर आणि संशयास्पद भाग म्हणजे पकडलेली अनधिकृत मासळी किनाऱ्यावर उतरवणे. यात तालुक्यात अनधिकृत पर्ससीन वाल्यांना मासळी उतरवण्यासाठी कोणतेही बंदर मंजूर नसताना हे लुटारू राजरोसपणे काही ठरावीक बंदरांवर आपली अनधिकृत मासळी उतरवत आहेत. इतकेच नाही तर ज्या ठिकाणी ही लूट केलेली मासळी उतरवली जात आहे त्याच ठिकाणी मत्स्य खात्याचे सुरक्षा रक्षक हजर असतात.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफांच्या मतदार संघातही मतदार यादीत घोळ, समरजितसिंह घाटगेंचा थेट आरोप

एका मत्स्य सुरक्षा रक्षक नावाच्या व्यक्तीच्या उपस्थितीतच हा प्रकार सुरू असताना याची माहिती मत्स्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कशी लागत नाही, हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे, असे जोगी यांनी म्हटले आहे. प्रशासन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना इतके मोकळे रान का देत आहे, यामागे मोठे अर्थकारण असल्याचा संशय मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. या लुटारू टोळीला कोणा बड्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद आहे की काय, अशी भीती मच्छीमारांना वाटत आहे.

मत्स्य विभागाच्या कानाडोळ्याचा ‘अर्थ’ काय

या गंभीर परिस्थितीत पारंपरिक मच्छीमारांनी कोणत्याही भीतीला न जुमानता पुढाकार घेतला आहे. अनधिकृत मासळी उतरवत असलेल्या बंदरांची माहिती मच्छीमारांनी थेट पोलिस अधिकारी आणि मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. या माहितीनंतर तरी तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. मत्स्य विभागाने तत्काळ याची दखल घेत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा मच्छीमारांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.