Election Commission : दुबार मतदारांचे एकच ठिकाणी मतदान; विरोधकांच्या मागणीनंतर निवडणूक यंत्रणा सावध
esakal October 19, 2025 03:45 PM

पांडुरंग म्हस्के

मुंबई : महाविकास आघाडीसह सर्वच विरोधी पक्षांनी राज्यातील मतदारांच्या नावांच्या दुबार नोंदी झाल्याचा आरोप केल्यानंतर नावांचा शोध घेऊन संबंधित मतदाराला कोणत्या मतदारसंघातून मतदान करायचे आहे, याबद्दल संमतिपत्र घेऊन दुबार मतदान रोखण्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे. अशी दुबार नावे शोधण्याचे आदेश सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे समजते.

एकाच व्यक्तीचे नाव दोन मतदारसंघांच्या मतदारयादीमध्ये असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राज्याचे निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर चोक्कलिंगम आणि वाघमारे यांच्या बैठकीत दुबार नावे शोधून संबंधित मतदाराला त्याला कोणत्या मतदार संघातून मतदान करायचे आहे, याबाबत विचारणा करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित मतदाराचे नाव दोन्ही ठिकाणच्या मतदारयादीत राहणार असले, तरी त्याने निवडलेल्या मतदारसंघातूनच मतदान करता येणार आहे.

Pune News: दिवाळीचा जल्लोष! फटाक्यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी! मतदारसंघाची निवड

‘‘काही ठिकाणी मतदाराचे नाव एकाच शहरात एकापेक्षा जास्त ठिकाणी दिसू शकते तर काहीवेळा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात त्याची नोंदणी असण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाचे विभागीय अधिकारी या पत्त्यांवर जाऊन संबंधित मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या तपशीलांची पडताळणी केल्यानंतर त्याला मतदारसंघ निवडण्यास सांगतील,’’ असे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पसंतीनंतर यादीत नोंद

मतदाराने त्यांच्या पसंतीच्या मतदानकेंद्राची निवड केल्यानंतर अन्य ठिकाणच्या मतदान केंद्रावरील यादीवर तशी नोंद केली जाईल. त्या ठिकाणी मतदारयादीमध्ये नाव असतानाही त्याला मतदान करता येणार नाही, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.