विरोधकांची गणिते मोडीत काढून भगवा फडकवणार
esakal October 19, 2025 03:45 PM

विरोधकांची गणिते मोडीत काढून भगवा फडकवणार
आमदार महेंद्र दळवी यांचा निर्धार; मुरूड तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
मुरूड, ता. १८ (वार्ताहर) ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह झळकतो आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड तालुक्यातील बारशिव येथील तालुका प्रमुख निलेश घाटवळ यांच्या निवासस्थानी आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मनोमिलन मेळावा संबोधित करताना विरोधकांची योजना मोडीत काढून जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार दळवी म्हणाले, शिवसेना पक्षात नेता आणि कार्यकर्ता यांच्यात विसंगती किंवा संवादाचा अभाव कधीच नसतो. पक्षाचे आदेश शिरसावंद्य मानून सर्व कार्यकर्ते एकदिलाने झोकून देऊन काम करतात. आगामी निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी आहेत. राजकीय नेत्यांनी कितीही डावपेच आखले तरी त्यांच्या गणितांना मोडीत काढून आम्ही जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार आहोत. या कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख आप्पा गोंधळी, रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोज कुमार शिंदे, ॲड. मयुरा मोरे, उपजिल्हा प्रमुख भरत बेलोसे, ऋषीकांत डोंगरीकर, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, यशवंत पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार दळवी यांनी आपल्या भाषणात १५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत सांगितले की, मी लोकांशी बांधिलकी असलेला प्रामाणिक आणि प्रयोगशील कार्यकर्ता असून, आपल्या शीर्षस्थ नेते एकनाथ शिंदे यांच्या हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून काम करावे. आगामी निवडणुकीत शिवसेना एक क्रमांकावर राहील, ही चोख कामगिरी करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, शत्रू पक्ष आता थकले असून कोणत्याही कार्यकर्त्याकडून सातबारा वा जागेचे असेसमेंट मागितले जाणार नाही. मागील निवडणुकीत मुरूड नगरपरिषदेत शिवसेनेला बहुमत मिळाले असल्याचे स्मरण करून, एकहाती सत्ता सोपवा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुरूड तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते अजगर दळवी यांनी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा अल्पसंख्य मतदार संघ प्रमुख म्हणून जिद्दीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच रोह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ॲड. मयुरा मोरे यांनीही शिवसेनेत प्रवेश करून स्थानिक नारी शक्तीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.