सणासुदीत खोबरे ५०० रुपयांवर
परराज्यातील नारळाचे उत्पादन घटल्याचा परिणाम
वाशी, ता. १८ (बातमीदार) ः एपीएमसीच्या घाऊक बाजारात खोबऱ्याचा प्रतिकिलोचा दर ३५० रुपये, तर किरकोळ बाजारात ५०० रुपयांना विक्री होत आहे. नारळाचे उत्पादन घटल्याने सणासुदीला मागणी अधिक, आवक कमी, अशी स्थिती बाजारात निर्माण झाल्याने दर वाढले आहेत.
कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळमधील पावसाचा फटका नारळ पिकाला बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नारळाच्या उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. देशभरातून नारळ आणि खोबऱ्याला मागणी आहे; मात्र पुरवठा होत नसल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात खोबऱ्याचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवस दरवाढ कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
-------------------------
नारळाचे दर ‘जैसे थे’
गणपती, नवरात्रीनंतर नारळाच्या मागणीत थोडी घट झाली आहे. त्यामुळे नारळाचे दर ३० ते ६० रुपयांच्या दरम्यान आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने नारळाच्या दरांत वाढ झालेली नाही, असे एपीएमसी मार्केटचे व्यापारी दीपक छेडा यांनी सांगितले.