Nashik News : दिवाळी भेट! नाशिक एसटीचा 'आवडेल तिथे प्रवास' पास दरात कपात; प्रवाशांसाठी जादा बसगाड्यांची सोय
esakal October 19, 2025 06:45 PM

नाशिक: दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने जादा बसगाड्या उपलब्ध केल्या आहेत. पुणे तसेच धुळ्यासाठी नाशिकहून दर पंधरा मिनिटांनी बस उपलब्ध असेल. तर छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, सटाणा या ठिकाणांसाठी दर अर्धा तासाला बस सुटणार आहे. ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेतील पासच्या दरांमध्ये कपात करत महामंडळाने प्रवाशांना दिवाळी भेट दिली आहे.

नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा बस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. आंतरजिल्हा व परजिल्ह्यासाठी या जादा बसगाड्या उपलब्ध असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध आगारांमधून छत्रपती संभाजीनगर, पुणे (शिवाजीनगर), धुळे, जळगाव, नंदुरबार, चोपडा, पाचोरा, अहिल्यानगर, शिर्डी आणि मुंबई (बोरिवली) यांसारख्या प्रमुख शहरांसाठी या अतिरिक्त बसचे नियोजन केले आहे.

नाशिकहून पुण्यासाठी आणि धुळ्यासाठी दर पंधरा मिनिटांनी बससेवा उपलब्ध असेल. तर नाशिक ते छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार आणि सटाणा या मार्गांवर दर अर्ध्या तासाने बस सुटतील.

Highway Traffic: मलकापूरनजीक महामार्ग दाेन तास ‘जाम’; उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी रस्त्यावर उतरून केली वाहतूक सुरळीत

चार आणि सात दिवसांचे पास उपलब्ध

प्रवाशांना ई-बसची सुविधादेखील उपलब्ध असेल. नाशिकहून सटाणा, बोरिवली, सप्तशृंगगड, त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी या मार्गांवर या बसगाड्या उपलब्ध असतील. महामंडळाने प्रवाशांना खास भेट देत ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या पास योजनेच्या दरात कपात केली आहे. हे नवीन दर गेल्या ८ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. या योजनेअंतर्गत ४ दिवस आणि ७ दिवसांचे पास उपलब्ध आहेत. दिवाळीच्या सुटीत गावी जाणाऱ्या प्रवाशांनी एसटीच्या जादा बस आणि सवलतीच्या दरातील पास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक किरण भोसले यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.