Pro Kabaddi 2025: तेलुगू टायटन्सने टॉप ८ मध्ये स्थान निश्चित! पुणेरी पलटनवर मिळवला ९ गुणांनी विजय
esakal October 19, 2025 08:45 PM

दिल्ली, १८ ऑक्टोबर २०२५: प्रो कबड्डी लीगस्पर्धेत शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटन आणि तेलुगू टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. पुणेरी पलटनने आधीच टॉप २ आपलं स्थान निश्चित केलं आहे त्यामुळे त्यांनी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. पण पुणेरी पलटनला हा सामना ४०-३१ गमवावा लागला आहे. पराभवानंतरही पुणेरी पलटनचा संघ टॉप २ मध्ये कायम राहणार आहे. तर विजयी तेलुगू टायटन्स संघाने टॉप ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.

या सामन्यात पुणेरी पलटनकडून सचिन पहिली चढाई करण्यासाठी आला. पहिल्याच चढाईत एक गुण घेत त्याने संघाचं खातं उघडून दिलं. तर तेलुगू टायटन्सकडून विजय मलिकने देखील १ गुण घेत संघाचं खातं उघडलं.

पूर्वार्धातील सहाव्या मिनिटाला पुणेरी पलटनला पहिला मोठा धक्का बसला. पुणेरी पलटनचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. यासह तेलुगू टायटन्सने १०-३ गुणांसह ७ गुणांची आघाडी घेतली. पूर्वार्धातील सुरुवातीच्या १० मिनिटात तेलुगू टायटन्स संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. १० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर तेलुगू टायटन्सचा संघ १४-४ गुणांसह १० गुणांनी आघाडीवर होता.

पूर्वार्धातील सुरुवातीच्या १० मिनिटात पिछाडीवर राहिलेल्या पुणेरी पलटनला दुसऱ्या टप्प्यातही हवी तशी कामगिरी करता आली नाही. १४ व्या मिनिटाला पुणेरी पलटनचा संघ दुसऱ्यांदा ऑलआऊट झाला. यासह तेलुगू टायटन्सने आपल्या आघाडीत २१-५ ने आघाडी घेतली. पूर्वार्धातील २० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर तेलुगू टायटन्सचा संघ २६- ११ गुणांसह १५ गुणांनी आघाडीवर होता.

उत्तरार्धात पुणेरी पलटनने पुजारागमन करण्याचा प्रयत्न केला. ७ मिनिटांचा खेळ झाल्यानंतर तेलुगू टायटन्सकडे ३०-१६ गुणांसह १४ गुणांची आघाडी होती. ८ व्या मिनिटाला तेलुगू टायटन्स संघावर ऑलआऊट होण्याचं संकट होतं. पुणेरी पलटनने या संधीचं सोनं करत पिछाडी कमी ३२-२० गुणांसह कमी केली. १० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर तेलुगू टायटन्सचा संघ ३३- २१ गुणांनी आघाडीवर होता.

शेवटची ५ मिनिटे शिल्लक असताना तेलुगू टायटन्सचा संघ ३६-२५ ने आघाडीवर होता. पुणेरी पलटनचा संघ पिछाडी भरून काढू शकला नाही. त्यामुळे पुणेरी पलटनला हा सामना ४०- ३१ ने गमवावा लागला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.