Marathi Entertainment News : लवकरच महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाचा टीझर आणि गाणी प्रेक्षकांना आवडले आहेत. त्यातच हा सिनेमा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा सिक्वेल आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. यावर नुकतंच महेश मांजरेकर यांनी स्पष्टीकरण दिलं.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा मी शिवाजीराजे भोसले बोलतोयचा नसल्याचं स्पष्ट केलं. हा सिनेमा स्वतंत्र आहे असं त्यांनी म्हटलं. काय म्हणाले ते जाणून घ्या.
"पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा केवळ ऐतिहासिक कथा नाही तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे. या चित्रपटाचा कोणत्याही पुरुनी प्रदर्शित झालेल्या सिनेमाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सिक्वेल, प्रिक्वेल किंवा दुसरा भाग नाही. हा सिनेमा संपूर्णपणे स्वतंत्र, मौलिक आणि आमच्या मनातून आणि श्रद्धेतून जन्माला आलेला आहे."
"आम्ही हे सर्व आमच्या प्रसिद्धी उपक्रमांमधून, माध्यमांमधून आणि संवादांमधून स्पष्टपणे सांगितले आहे. मराठी प्रेक्षक हे सुजाण, जाणकार आणि संवेदनशील आहेत. इतिहासाविषयी त्यांचं प्रेम आणि अभिमान आम्हालाही प्रेरणा देतो. त्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा किंवा चुकीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून कधीच झालेला नाही आणि होणारही नाही.\
या चित्रपटाच्या कथेत आम्ही एका गहिऱ्या भावनेला आकार दिला आहे — छत्रपती शिवाजी महाराज १६८० नंतर पुन्हा एकदा या पवित्र महाराष्ट्रभूमीवर अवतरतात. ही केवळ कल्पना नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या अंतःकरणात पेटलेली एक ज्वाला आहे — ‘राजे पुन्हा येतील, आपल्या मातीचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करतील!’"
हा सिनेमा 31 ऑक्टोबर 2025 ला रिलीज होतोय. सिद्धार्थ बोडकेची या सिनेमात मुख्य भूमिका आहे.