Ravindra Dhangekar : निलेश घायवळ सापडत नाही, काही सेटलमेंट आहे का? रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
Tv9 Marathi October 19, 2025 10:45 PM

Pune News : पुण्यातील गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) प्रकरणात समीर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत गप्प बसणार नाही असे शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले. निलेश घायवळला अटक होईपर्यंत लढाई थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर पुण्यात आता भाजपविरुद्ध शिंदे सेना अशी राजकीय लढत पाहायला मिळत आहे. ठाणे, नवी मुंबईनंतर दोन्ही पक्षात पुण्यामध्ये मोठे खटके उडण्याची शक्यता आहे.

मी गप्प बसणार नाही

सध्या दिवाळी असल्याने कोर्टाला सुट्या आहेत. वकील मंडळीना सुट्या आहेत. दिवाळी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करु. समीर पाटलांचा विषय सुटण्यासारखाच नाही. निलेश घायवळ सापडत नाही आणि समीर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. हा समीर पाटील प्लॅनर आहे. शहरातील पबपासून ते ड्रग्सपर्यंतचे अर्थकारण समोर येईल. समीर पाटील हा त्यांचा पीए नव्हता, तर दुसरंच काही तरी निघाला. त्याला मी उत्तर देणारच आहे. माझ्यावर मोक्का लावणार असे समीर पाटील म्हणाला. मी त्याला तयार आहे, अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली.

सोबत आहेत पुणेकर म्हणून…

निलेश घायवळ अद्याप सापडत नाही. यामध्ये पोलिसांचे मोठे अपयश आहे. मी आवाज नसता उठवला तर हे गुन्हे दाखल झाले नसते. आवाज उठवला म्हणून 7-8 गुन्हे दाखल झाले आहेत. ही दरोडखोरी जी सुरू आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे धंगेकर म्हणाले. भाजपच्या मंत्र्यांविरोधात काल धंगेकरांनी ट्वीट केले होते. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेना यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना ‘सोबत आहेत पुणेकर म्हणून लढतात धंगेकर’ असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी याप्रकरणात भाजपविरोधात मोर्चा उघडला आहे. निलेश गायवळ ज्या पद्धतीने दादागिरी करतोय खोटा पासपोर्ट केला लोकांचे मुडदे पाडले किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात. यामुळेच त्यांचं धाडस होत आहे, असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला होता. आता त्यांनी पुण्यात भाजपाविरोधात थेट मोर्चा उघडल्याचे समोर येत आहे. थोड्याच वेळात ते याप्रकरणात सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते अजून कुणावर काय आरोप करतात आणि काय गौप्यस्फोट करतात, भाजप नेत्यांवर काय आरोप करतात याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.