Nashik News : गोल्फ क्लब मैदानावर महाराष्ट्राचा दबदबा! सी. के. नायडू करंडकात सौराष्ट्रवर १० गडी राखून दणदणीत विजय
esakal October 19, 2025 11:45 PM

नाशिक: सलामीवीर नीरज जोशी (नाबाद १३४ धावा) आणि अनिरुद्ध साबळे (नाबाद ७४ धावा) यांच्या धुव्वाधार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्रविरुद्ध दणदणीत विजय मिळविला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब मैदान) खेळण्यात येत असलेल्या सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी शनिवारी (ता. १८) महाराष्ट्राने दहा गडी राखून हा सामना जिंकला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्रविरुद्ध सौराष्ट्रचा सामना क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरला. गुरुवारी (ता. १६) सुरू झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा पहिला डाव डळमळीत राहिला. सौराष्ट्र संघाला पहिल्या डावात आघाडी मिळालेली होती. असे असताना महाराष्ट्र संघाने उत्तम समन्वय व उत्कृष्ट खेळी करत सामन्यात विजय मिळविला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना शुक्रवारी (ता. १८) सौराष्ट्र संघाची ५ बाद ६० अशी धावफलकावरील स्थिती होती. या संघाकडे १२९ धावांची आघाडी होती. तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १८) सकाळपासून महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवत सौराष्ट्रच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही व ७० धावांवर मौर्य घोघारीला जलदगती गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकरने बाद करताना फलंदाजांवर दबाव आणला.

नंतरच्या फलंदाजांनी मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाग्यराजसिंह चुडासमा ६६ धावांवर खेळत असताना शुभम मैडच्या चेंडूवर धसच्या हाती झेलबाद झाल्याने सौराष्ट्रला सातवा झटका बसला. क्रेन्स फुलेत्राला शुभमने बाद करत आठवा झटका दिला. तीर्थराज जडेजाकडून संघाला मोठ्या अपेक्षा असताना, त्याला विशेष योगदान देता आले नाही.

तीर्थराजला शुभमने ११ धावांवर बाद केले व चंद्रराज राठोडला बाद करताना दुसऱ्या डावात महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सौराष्ट्र संघाला अवघ्या १३८ धावांवर रोखले. महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगर्गेकरने ४, शुभम मैडने ३, नीरज जोशीने २, सलामने १ गडी बाद केले.

महाराष्ट्र संघापुढे विजयासाठी २०७ धावांचे आव्हान असताना, सलामीचे फलंदाज नीरज जोशी आणि अनिरुद्ध साबळे यांनी सुरुवातीपासून लय धरताना तुफान फटकेबाजी केली. नीरजने १४९ चेंडूंत १९ चौकार लगावत नाबाद १३४ धावांची बलाढ्य खेळी केली. त्याला अनिरुद्धने साथ देताना १४३ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या जोरावर ७४ धावांचे योगदान दिले.

या द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने १० गडी राखून सामन्यात विजय मिळविला व चार दिवसांचा सामना तिसऱ्याच दिवशी निर्णायक ठरला. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे व इतर पदाधिकाऱ्यांनी विजयी महाराष्ट्र संघातील खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक निरंजन गोडबोले व इतर सहकाऱ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

IND vs AUS 1st ODI Live: टीम इंडियाला अक्षर पटेल, लोकेश राहुलने दिला आधार; २६ षटकांच्या सामन्यांत ऑसींसमोर 'इतके' लक्ष्य

क्षणचित्रे...

संपूर्ण सामन्यात केवळ सहा षटकार

दुसऱ्या डावात दोन्ही संघांकडून एकही षटकार नाही

नीरज-अनिरुद्धमध्ये २०८ धावांची सर्वांत मोठी भागीदारी

नीरजने गोलंदाजीत दोन गडी बाद, झेल घेताना अष्टपैलू कामगिरी

सौराष्ट्रकडून दुसऱ्या डावात आठ खेळाडूंनी केली गोलंदाजी

सामन्यात राजवर्धन हंगर्गेकरचे ८, शुभम मैडचे ७ बळी

सौराष्ट्रच्या मौर्य, साक्रेन्सच्या नावावर प्रत्येकी ४ बळी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.