काळेवाडी, ता.१९ : काळेवाडी परिसरातील दुकानदार, व्यावसायिकांनी एकीकडे पदपथांवर कब्जा केला असून दुसरीकडे बेकायदा पार्किंग अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. मात्र, महापालिकेकडून अतिक्रमणांवर तर वाहतूक पोलिसांकडून बेकायदा पार्किंगवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
काळेवाडी येथील मुख्य रस्ता, पदपथ व व्यावसायिकांच्या दुकानाबाहेर अतिक्रमणे वाढली आहेत. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या प्रशस्त पदपथांवरच आता छोट्या - मोठ्या व्यवसायिकांनी ठाण मांडले आहे. नागरिकांना पदपथ सोडून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असल्याचे दृश्य नवीन नसून यामुळे अपघातास आमंत्रण मिळत असल्याचे दिसून येत आहे. पदपथाच्या दुसऱ्या बाजूला मुख्य रस्त्याला लागून चारचाकी, तीन चाकी व मोठ्या बस यांचे अनधिकृत पार्किंग हा एक डोकेदुखीचा प्रकार नित्याचा झाला आहे. काही व्यावसायिक आपल्या दुकानापुढे पोटभाडेकरू पद्धतीने छोट्या व्यावसायिकांकडून अवाच्यासव्वा भाडे आकारत आहेत. काळेवाडी परिसरातील पिंपरी पूल ते काळेवाडी फाटा या दुहेरी रस्त्यावर अगोदरच अपघातांची मालिका घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुख्य समस्या
- सुमारे सहा फूट रुंद पदपथ, पण त्यावर पादचाऱ्यांना चालण्यास जागा नाही
- रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवैध, बेशिस्त पार्किंग
- अतिक्रमण निर्मलून विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
- बेकायदा पार्किंग, अतिक्रमणे, वाहनांच्या कोंडीमुळे नागरिक हैराण
सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अतिक्रमण निर्मूलन विभागातील अनेक कर्मचारी मतदार यादी संदर्भात घरोघरी जाऊन काम करत आहेत. त्याने कर्मचाऱ्यांची संख्या विभागली आहे. त्यामुळे सध्या केवळ एकच पथक कार्यरत असून त्याला कारवाई करण्यास सांगतो.
- प्रदीप गायकवाड, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय
सायंकाळी रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. पदपथ छोट्या व्यावसायिकांनी काबीज केले असून रस्ता अरुंद होऊन वाहनांच्या गर्दीमुळे कधीही अपघात होईल, अशी स्थिती आहे.
- सूर्यकांत नढे, रहिवासी