विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) ः फटाक्यांचा आवाज जितका मोठा, तितकी दिवाळी जोरात असल्याचा अनेक नागरिकांमध्ये समज आहे. फटाक्यांवर मर्यादा आल्याने त्यानुसार कर्णकर्कश आवाजाचे फटाके फोडण्यासाठी चढाओढ लागते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे; परंतु आता ग्राहक जरा सजग झाला आहे. त्याला पर्यावरणाची चिंता आहे. त्यामुळे मोठ्या आवाजाच्या फटाक्यांकडे पाठ फिरवली जात असून फॅन्सी, रंगीबेरंगी आतषबाजीला जास्त पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
ध्वनी व वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. दिवाळीत यात आणखी भर पडते. प्रदूषणाला आमंत्रण देणारे मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नयेत, असे आवाहन पर्यावरणप्रेमी संघटनांकडून सातत्याने केले जाते. त्यात काही वर्षांपासून पर्यावरणप्रेमी संस्थांकडून ध्वनी व वायू प्रदूषण करू नये, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत या आवाहनाला या वर्षी विक्रमगड परिसरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक ग्राहकांनी आतषबाजी करणाऱ्या फटाक्यांच्या खरेदीवर भर दिल्याचे फटाकेविक्रेते प्रणीत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आवाजी फटाक्यांच्या मागणीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
अनेक ठिकाणी धनत्रयोदशीपासून दिवाळीला खरी सुरुवात झाली आहे. त्यानंतर पुढील म्हणजेच पाडव्यापर्यंत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे या चार दिवसांतच खऱ्या अर्थाने फटाक्यांची विक्रमी विक्री होते.