रावेत, ता.१९ : रावेत, आकुर्डी परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘दिवाळी पहाट’ आणि ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आले. काही सोसायट्यांमध्ये सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका आणि पर्यावरणपूरक उपक्रमही राबविण्यात आले.
या कार्यक्रमांत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला. रंगीबेरंगी रोषणाई आणि पारंपरिक पोशाखातील नागरिक यामुळे सर्वत्र उत्सवी वातावरण पसरले. नृत्य स्पर्धा, गायन, फॅन्सी ड्रेस, आणि पारंपरिक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे सोसायट्यांचा परिसराने जत्रेचे रूप धारण केले.
सेलेस्टियल्स, सिल्वर ग्रासिया, नॅनो होम, शिवकरण, रुग्णाल स्पेसियो आणि रुणाल गेट वे, एनबी भोंडवे सोसायटी, चंद्रभागा कॉर्नर, २७ मेरिडियन, जीके सोसायटी यांच्यासह अनेक सोसायट्यांचा त्यामध्ये समावेश होता. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र येऊन फराळाचा आस्वाद घेतला आणि फटाक्यांच्या रोषणाईत कार्यक्रमांची सांगता केली. रावेत, आकुर्डी परिसरात अशा उत्सवी कार्यक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि एकमेकांबद्दल आपुलकी वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. जीके सोसायटीमधील रहिवासी अनघा पाटील म्हणाल्या, ‘‘दिवाळी म्हणजे केवळ दिवे आणि फराळ नव्हे; तर एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी. आमच्या सोसायटीत सर्वांनी मिळून सुंदर कार्यक्रम सादर केला.’’
दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही दिवाळी संध्या समाजभावनेने साजरी केली. मुलांनी पारंपरिक वेशभूषेत केलेले नृत्य पाहून सर्वांना अभिमान वाटला.
- सचिन जाधव, सिल्वर ग्रीन सोसायटी
दिवाळी संध्या म्हणजे रहिवाशांमधील नाते घट्ट करणारा सोहळा आहे. एकमेकांना भेटून शुभेच्छा देताना जुनी ऊब पुन्हा जाणवते.
- किरण देशमुख, रहिवासी, शिवकिरण सोसायटी