आंबेवाडी उड्डाण पुलाखाली 'यु' पद्धतीचे पूल बांधावे
esakal October 21, 2025 08:45 AM

आंबेवाडी उड्डाणपुलाखाली ‘यु’ पद्धतीचे पूल बांधावे
रिक्षा, टेम्पो संघटनेसह ग्रामस्थांची मागणी; एनएचएआयला निवेदन
रोहा, ता. २० (बातमीदार) : मुंबई–गोवा महामार्गावरील कोलाडजवळील आंबेवाडी नाका येथे उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलामुळे महामार्गाचा प्रवास अधिक सुकर होणार असला तरी स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांच्या दैनंदिन हालचालींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी पुलाच्या खाली दोन्ही बाजूंना येण्या-जाण्यासाठी भुयारी मार्ग किंवा ‘यु’ आकाराचे छोटे पूल बांधावेत, अशी ठोस मागणी आंबेवाडी आणि वरसगाव येथील ग्रामस्थांनी एनएचएआयच्या संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या उड्डाणपुलाची लांबी जवळपास एक किलोमीटर इतकी असून, पुलासोबतच रस्त्याचे रुंदीकरणाचे कामही सुरू आहे, मात्र या ठिकाणी पुलाच्या खाली पादचारी आणि वाहनांसाठी कोणतीही सोय नसल्याने नागरिकांना दुसऱ्या बाजूस जाण्यासाठी तब्बल अर्धा किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. यामुळे शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, सरकारी दवाखाना, ज्येष्ठ नागरिक सभागृह, तसेच स्थानिक बाजारपेठ गाठणे त्रासदायक ठरत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुलामुळे गाव दोन्ही बाजूंनी विभक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास उशीर होईल, व्यावसायिकांना वस्तू पोहोचविणे कठीण होईल आणि आपत्कालीन सेवांसाठी विलंब होण्याचा धोका आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी पुलाखाली दोन ठिकाणी ‘यू’ पद्धतीचे छोटे पूल किंवा बोगदे तयार करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
...........
या मागणीसाठी स्थानिक टेम्पो व इको संघटना, रिक्षा संघटना तसेच आंबेवाडी–वरसगावचे नागरिक एकत्र आले असून, संजय कुर्ले, महेंद्र वाचकवडे, चंद्रकांत लोखंडे, दीपक कुशवाहा, सागर पाटेकर, केदार कुशवाह, आकाश घोणे, राजपाल वर्मा आणि नगीना यादव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे. महामार्गाचे आधुनिकीकरण स्वागतार्ह आहे, पण स्थानिक जीवनावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे या वेळी सांगण्यात आले. त्यामुळे एनएचएआय आणि संबंधित प्रशासन या मागणीचा गांभीर्याने विचार करून दोन्ही गावांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देतील, अशा विश्वास व्यक्त केला जात आहे. अन्यथा, स्थानिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.