उंडवडी, ता. २० : सोनवडी सुपे (ता. बारामती) परिसरात गेल्या काही दिवसांत तरसांचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनवडी सुपे हद्दीत सुमारे ९१ हेक्टरचे वनक्षेत्र असून, येथे ससे, हरिण, कोल्हे, लांडगे आदी वन्यप्राणी आढळतात. मात्र, अलीकडे तरस हे वन्यप्राणीही या परिसरात दिसू लागले आहेत. मागील दोन महिन्यांपासून हे प्राणी वनक्षेत्राबाहेर येऊ लागले असून, गेल्या चार दिवसांत वावगेवस्ती, पठार आणि गावठाणालगतच्या शेतात तरस फिरताना दिसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळी गावाच्या हद्दीत शिरून कुत्र्यांवर हल्ले करणाऱ्या तरसांचे प्रकार वाढले असून, काही कुत्री बेपत्ता झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नुकतेच सोनवडी येथील शेतात माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी प्रत्यक्ष तरस पाहिला. तरसांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तरसाच्या भीतीपोटी शेतात पिकाला पाणी द्यायला एकटे कसे जावे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. अनेकवेळा दिवसा भारनियमन असल्यामुळे पाण्याला आलेल्या पिकांना रात्रीच शेतीपंप सुरू करून पाणी द्यावे लागते. मात्र, या काळात तरसाचा हल्ला होण्याची भीती असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. याशिवाय, अनेक शेतकऱ्यांच्या पीक भिजवलेल्या पाटांमध्ये तरसाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती अधिकच वाढली आहे.
शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतावर एकटे न जाण्याचा आणि जनावरांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचा सल्ला ज्येष्ठांनी दिला आहे. याबाबत वनविभागाने तातडीने गस्त वाढवून तरसांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.