swt209.jpg
99753
सावंतवाडी ः स्पर्धेतील सर्व बक्षीसपात्र स्पर्धकांसह उपस्थित मान्यवर.
श्रावणी आरावंदेकर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
सावंतवाडीतील स्पर्धाः समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९३२ च्या सावंतवाडी भेटीला उजाळा देण्यासाठी समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीने घेतलेल्या ‘स्मृती विचार संवर्धन’ या खुल्या वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी आरावंदेकर प्रथम, जेम्स डिसूझा द्वितीय तर चिन्मय असनकर, संग्राम कासले तृतीय ठरले. ही स्पर्धा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान तथा समता प्रेरणाभूमीत रविवारी (ता. १९) घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू यांच्या प्रमुख उपस्थितीत व समता प्रेरणाभूमी अध्यक्ष दीपक पडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
समता प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या पुण्यभूमीचे महत्त्व विशद केले. उद्घाटक तथा प्रमुख अतिथी वळंजू यांनी स्पर्धेतील स्पर्धकांचे विषय मांडण्याचे कौशल्य, सभाधीटपणा व व्यासंग याचे कौतुक केले. समन्वय समितीचे उपाध्यक्ष चव्हाण यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात पडेलकर यांनी या पुण्यभूमीचे रुपांतर प्रेरणाभूमीत होण्यासाठी समता प्रेरणाभूमी सतत प्रयत्नशील असून, येत्या काही वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीचे शतक महोत्सवी वर्ष साजरे होणार आहे, असे सांगितले.
या स्पर्धेत १५ स्पर्धकांनी भाग घेतला. यामध्ये प्रथम श्रावणी आरावंदेकर (२००० रुपये), जेम्स डिसुझा (१५०० रुपये), तृतीय क्रमांक विभागून संग्राम कासले/चिन्मय असनकर (१००० रुपये), उत्तेजनार्थ प्रथम शमिका आरावंदेकर, द्वितीय फिरदोस तैस, तृतीय दिया मसुरकर. या सर्व स्पर्धकांना सुनील कुणकेरकर, कांता जाधव यांनी हस्ते सन्मानचिन्हे व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे पुरस्कृत केली होती. परीक्षक ॲड. सगुण जाधव व प्रसिद्ध निवेदक राहुल कदम यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. कांता जाधव यांनी आभार मानले.