जपूया बिज वारसा
esakal October 21, 2025 03:45 PM

जपूया बीज वारसा----------लोगो
(१४ ऑक्टोबर टुडे ३)

दिवाळी हा खरीपाच्या हंगामानंतर साजरा केला जाणारा सण आहे. साधारणपणे वैशाख महिन्यापासून सुरू झालेली शेतीची लगबग, पीक तयार होऊन त्याची कापणी आणि मळणी झाल्यावर थांबते. शेतकऱ्यांनी गेले सहा महिने शेतात केलेले पीक-पाणी, वेळेचे नियोजन आणि कष्ट यांचे चीज होण्याचा हा काळ ‘सुगी’ म्हणून ओळखला जातो.

- rat२०p३.jpg-
25N99700
– कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था
---
दिवाळी आणि कृषी संस्कृती

आपल्यापैकी अनेकांना शाळेत ईर्जिक ही कविता अभ्यासक्रमात होती.
‘दिवस सुगीचे सुरू जाहले,
ओला चारा, बैल माजले,
शेतकरी मन प्रफुल्ल झाले,
लेझीम चाले जोरात!’
अशा प्रकारे गाणी गाऊन, नाचून, शेतीचा हा उत्सव साजरा केला जातो. या सर्व प्रक्रियेत सोबत असणाऱ्या शेजाऱ्यांबद्दल, नातेवाईकांबद्दल, गुरा-ढोरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. सर्वांना फराळ देऊन त्यांचे तोंड गोड केले जाते. कोकणात देव दिवाळी (मार्गशीर्ष प्रतिपदा) ही बैलपोळा सारखी साजरी केली जाते. गायी-बैलांना आंघोळ घालून त्यांची शिंगे रंगवली जातात, त्यांना गोड जेवण करून घातले जाते.
‘दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी
गायी-म्हशी कुणाच्या, लक्षुमनाच्या
लक्षुमन कुणाचा, आईबापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी...’
यासारखी लोकगीते ही पारंपरिक दिवाळी कशाप्रकारे साजरी केली जायची, हे दाखवून देतात. दिवाळीच्या लोकगीतांमध्ये शेतकरी राजा बळी यालाही मोठा मान आहे. भारतातील विविध भागांमध्ये बळी हा शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. बळी प्राचीन भारतातील एक पराक्रमी आणि तेवढाच प्रजाहितदक्ष राजा होता. तो त्याच्या न्यायीपणासाठी प्रसिद्ध होता. त्याची आठवण म्हणून कार्तिक प्रतिपदा ही बळी प्रतिपदा म्हणून साजरी केली जाते.
‘इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे!’
अशी प्रार्थना केली जाते.
कोकणातील अलिबाग-मुरुड परिसरातील आगरी समाजात दिवाळीत शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते. पूजा झाल्यावर हे शेणाचे गोळे घराच्या कौलांवर फेकले जातात. यामुळे बळीराजाची आपल्या घरावर कृपा राहते, अशी श्रद्धा आहे.
गेली दहा हजार वर्षे ही कृषी संस्कृती सतत सृजनाचे आणि मानवजातीच्या भरण-पोषणाचे कार्य करत आली आहे. याची जाणीव शहरातील समाजाने ठेवणे खूप आवश्यक आहे.
या वर्षी भारतातील महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या कृषी क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या राज्यांमधील शेतकरी दिवाळी साजरी करू शकणार नाहीत. यावर्षीच्या अतिवृष्टीने त्यांची पिके, माती, गुरे-ढोरे, घरे – सारेच वाहून नेले. याची जाणीव म्हणून या वर्षीच्या दिवाळीत एक दिवा शेतकऱ्यांसाठी पेटवूया. त्यांच्यासाठी जमेल तशी मदत पोहोचवायचा प्रयत्न करूया!

(लेखक स्वत: शेतकरी असून आदिम बियाणी संवर्धन करत आहेत)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.