मोबदलाधारकांना
ऐनारीत मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरीः ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेअंतर्गत ज्या मोबदलाधारकांनी अद्याप मोबदला घेतलेला नाही, त्यांना मोबदला वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत ऐनारी (ता. वैभववाडी) येथे शिबिर घेण्यात आले. यामध्ये भूसंपादन प्रस्ताव क्र. २२/२००७ ऐनारीमधील २४ मोबदलाधारकांना मोबदला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. तसेच अन्य खातेदारांना कागदपत्रांविषयी व त्यांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी शिरोडकर यांनी दिली. शिबिरास जिल्हा भूसंपादन उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, सरपंच श्रीमती सुर्वे, पोलिसपाटील, ग्रामस्थ, भुईबावडा मंडळ अधिकारी, तलाठी व उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
.......................
आंदुर्लेत आजपासून
़़़कला महोत्सव-२०२५
कुडाळः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले ग्रामपंचायतीतर्फे उद्यापासून (ता. २२) श्री देवी आंदुर्लाई मंदिर येथे ‘कला महोत्सव-२०२५’चे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. गावातील कला, संस्कृतीचे संवर्धन व प्रसार या महोत्सवातून होणार आहे. उद्या सकाळी १० वाजता सुदृढ वासरू स्पर्धा, ११ वाजता सुदृढ बालक स्पर्धा (वयोगट १ ते ३ वर्षे), सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी पाककला कृती स्पर्धा (शाकाहारी पदार्थ), ७ वाजता कला महोत्सव प्रारंभ, ७.३० वाजता वेशभूषा स्पर्धा, रात्री ८ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे. गुरुवारी (२३) सकाळी ९.३० वाजता रांगोळी स्पर्धा (खुला गट), सायंकाळी ६ वाजता पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा, ६.३० वाजता टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या हस्तकला स्पर्धा, ६.४५ वाजता जुन्या साड्यांपासून कापडी पिशव्या बनविणे स्पर्धा, ७ वाजता पारितोषिक वितरण, ७.३० वाजता गावातील शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
...
‘शिवप्रेमी’ मंडळातर्फे
वेंगुर्लेत विविध स्पर्धा
वेंगुर्लेः वेंगुर्ले माणिकचौक शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे दीपावलीचे औचित्य साधून महिलांसाठी ऑनलाइन रांगोळी स्पर्धा, मुलांसाठी ऑनलाइन किल्ले स्पर्धा तसेच दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. रांगोळीसाठी स्पर्धकांनी घरीच रांगोळी काढून पूर्ण झाल्यानंतर त्याचे एचडी फोटो व्हॉट्सअॅपवर २३ ऑक्टोबरपर्यंत पाठवावेत. रांगोळीखाली नाव आणि तारीख लिहिणे आवश्यक आहे. स्पर्धेत सर्वोत्तम तीन क्रमांक काढण्यात येतील. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन किल्ले स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी २३ ऑक्टोबरपर्यंत किल्ल्याचा संपूर्ण व्हीडिओ, किल्ल्याबरोबर एक ग्रुप फोटो (एचडी) व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावा. स्पर्धकाला बनविलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची दोन मिनिटे माहिती सांगता येणे आवश्यक आहे. तसेच २४ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता माणिकचौक येथे सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल पुरस्कृत रामेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
.....................
तळवडेत शुक्रवारी
रक्तदान शिबिर
सावंतवाडीः प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (ता. २४) प्रकाश परब संपर्क कार्यालय, तळवडे गेट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. प्रकाश परब मित्रमंडळ, श्री सिद्धेश्वर ग्रामोत्कर्ष मंडळ तळवडे, अर्बन बॅंक, शिवरामभाऊ जाधव सेवाश्रम, तळवडे विकास सोसायटी, रोटरी क्लब व ऑनकॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्यातर्फे हे शिबिर होत आहे.