नाशिक: तब्बल साडेतीन वर्षांनंतर मुहुर्त लागलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आरक्षण सोडतीनंतर आता उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यात सख्खे भाऊ, चुलते-पुतणे, चुलतभाऊ यांच्यातच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. ऐन दिवाळीतच उमेदवारांमध्ये चढाओढ रंगल्याने नातेसंबंधात ‘सुरसुरी’ पेटली आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आरक्षण सोयीचे निघाल्यानंतर इच्छुकांना धुमारे फुटले असून, एकाच कुटुंबातून दोन-तीन इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापूर्वी उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील.
विशेषत: महायुतीत सर्वाधिक रस्सीखेच असल्याने राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या उमेदवारीकडे इच्छुकांचा कल स्वाभाविकपणे जास्त दिसतो. नात्यांमध्येच उमेदवारीची वीण गुंफली जात असल्याने कुणाला नाही म्हणायचे अन् कुणाला उमेदवारी द्यायची, याविषयी नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
नांदगावमधे भालूर गटातून शिवसेनेचे माजी आमदार संजय पवार व त्यांचे बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार दोघेही इच्छुक आहेत. दोघांनीही उमेदवारीसाठी पक्षाकडे दावा केला आहे. यात कुणाला संधी मिळते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नागापूर ग्रामपंचायतीच्या निमित्ताने या दोघांमध्ये निर्माण झालेला संघर्ष आता जिल्हा परिषदेतही बघायला मिळेला का, याविषयी उत्सुकता आहे.
न्यायडोंगरी गटात नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर व त्यांचे काका विलास आहेर हे दोघेही शिवसेनेकडून इच्छुक आहेत. विलास आहेर यांचा बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांचे पुनर्वसन होणार की दर्शन आहेरांना चाल मिळणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
येवल्यातही नगरसूल गटात माजी सभापती संभाजी पवार व त्यांचे चुलत-चुलत भाऊ गोरख पवार यांच्यातच लढत होण्याची शक्यता वाढली आहे. सिन्नरमध्ये मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे सोमठाणे गटातून तयारीला लागल्या आहेत. या गटातच त्यांचे काका भारत कोकाटे इच्छुक असल्याने या दोघांमध्येच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. भारत कोकाटे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा महायुतीतच हा सामना बघायला मिळेल.
Local Government Elections: दिवाळीनंतर सत्तेचा फटका कोण फोडणार? | Mahavikas Aghadi | Mahayuti | Sakal Newsकाका अन् पुतण्यातच लढाई
निफाड तालुक्यातील सायखेडा गट महिलांसाठी आरक्षित निघाल्याने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते यांच्या पत्नी उज्ज्वला येथून इच्छुक आहेत. त्यांचे काका दिगंबर गिते यांच्या स्नुषा दीपाली गितेही इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारांपेक्षा काका-पुतण्यांमध्येच ही लढत होईल. चांदवडमधील वडाळीभोई गटात माजी सदस्य कारभारी आहेर व बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्येच लढत झाल्यास नातेवाइकांसह मतदारांची कोंडी होते.