टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर आता दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील दुसरा एकदिवसीय सामना हा एडलेड ओव्हलमध्ये गुरुवारी 23 ऑक्टोबरला होणार आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला या सामन्यात काही खास विक्रम करण्याची संधी आहे. विराटला पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे विराटचा दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे.
विराटचा हा एडलेमधील 13 वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. विराटने आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 975 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 शतकं झळकावली आहेत. विराटने यातील 5 पैकी 3 शतकं कसोटीत तर 2 शतकं एकदिवसीय क्रिकेटमध्ये केली आहेत. विराटला एडलेडमध्ये आणखी 1 शतक करुन मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. विराटला या मैदानात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा फलंदाज होण्याची संधी आहे. एडलेडमध्ये 1975 पासून एकदिवसीय सामने खेळवण्यात येत आहेत. मात्र 50 वर्षांच्या इतिहासात एकाही फलंदाजाला या मैदानात 3 एकदिवसीय शतकं करता आली नाहीत. त्यामुळे विराट ऐतिहासिक कामगिरी करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विराटला एडलेडमध्ये शतक करुन आणखी एक महारेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. विराटने या सामन्यात शतक केल्यास तो ऑस्ट्रेलियातील कोणत्याही एका मैदानात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक करणारा पहिला विदेशी फलंदाज ठरेल. सध्या संयुक्तरित्या विराट कोहली आणि इंग्लंडच्या जॅक हॉब्स या दोघांच्या नावावर हा विक्रम आहे. जॅक हॉब्स यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थात एमसीजी इथे 5 शतकं लगावली आहेत.
तसेच विराट कोहली याच्याकडे आणखी एक अविस्मरणीय अशी कामगिरीची संधी आहे. विराटला एडलेडमध्ये 1 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याची संधी आहे. विराटला त्यासाठी फक्त 25 धावांची गरज आहे. विराट 25 धावा करताच या मैदानात 1 हजार आंतरराष्ट्रीय रन्स करणारा एकमेव फलंदाज ठरेल. विशेष म्हणजे सध्या या मैदानात सर्वाधिक धावांचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. ऑस्ट्रेलियातील या मैदानात त्यांच्या फलंदाजांपेक्षा आपल्या विराटच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा असणं हे प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी अभिमानाची बाब आहे.