पणजी, ता. २० (क्रीडा प्रतिनिधी) ः पोर्तुगीज सुपरस्टार, पाच वेळचा सर्वोत्तम जागतिक फुटबॉलपटू किताबाचा मानकरी ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात स्पर्धात्मक फुटबॉल खेळण्याच्या शक्यतेला सोमवारी तडा गेला. सौदी अरेबियातील अल नासर क्लब कर्णधाराविना एफसी गोवाविरुद्धच्या लढतीसाठी रवाना झाल्याचे वृत्त आहे.
एएफसी चॅम्पियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या ड गटातील सामना बुधवारी (ता. २२) फातोर्डा-मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सौदी अरेबियन क्लब सोमवारी रात्री उशिरा गोव्यातील दाबोळी विमानतळावर दाखल होईल, त्यानंतर मंगळवारी या संघाच्या प्रशिक्षकाची अधिकृत स्पर्धा पत्रकार परिषद नियोजित आहे. रियाधमधील स्थानिक वृत्तपत्र अल रियाधियानुसार, रोनाल्डोविना अल नासर क्लब गोव्यास रवाना झाला आहे.
एफसी गोवा संघातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डो अल नासर क्लबसमवेत प्रवास करत नसल्याची माहिती आहे, याचाच अर्थ तो गोव्यातील सामन्यात खेळणार नाही, मात्र इतर प्रमुख खेळाडू लिव्हरपूल क्लबचा माजी दिग्गज सादियो माने, स्पॅनिश जुवाव फेलिक्स संघासमवेत येत आहेत.
एफसी गोवाच्या प्रमुख अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या सूचनेवरून सुरक्षिततेच्या कारणास्तव एफसी गोवा संघाने अल नासर क्लबशी रोनाल्डोच्या आगमनाविषयी वारंवार विनंती केली, परंतु सौदी अरेबियन क्लबने त्याबाबत स्पष्ट काहीच कळविले नाही. या क्लबचे दोन तांत्रिकविषयक अधिकारी दोन दिवसांपूर्वी गोव्यात पाहणीसाठी आले होते. त्यांनी राज्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर, तसेच इतर संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांशी सामन्याच्या तयारीविषयी चर्चा केली होती, परंतु रोनाल्डो येण्याविषयी वाच्यता केली नव्हती. गोवा पोलिसांनाही त्यांनी माहिती दिली नव्हती.
गोवा सरकार अल नासर क्लबविरुद्धच्या सामन्यासाठी, तसेच रोनाल्डोच्या संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने सज्ज असल्याचे नुकतेच राज्याचे क्रीडामंत्री तवडकर यांनी नमूद केले होते, तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रोनाल्डो महान फुटबॉलपटू असून, त्याची गोवाभेट राज्यासाठी अभिमानास्पद, तर युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे म्हटले होते.
एएफसी चॅम्पियन्स लीग २ स्पर्धेच्या ड गटात दोन्ही सामने जिंकून अल नासर क्लब सध्या सहा गुणांसह अव्वल स्थानी आहे. एफसी गोवा संघाला दोन्ही लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. फातोर्डा येथे त्यांना अल झावरा क्लबने, तर ताजिकिस्तानमध्ये एफसी इस्तिक्लोल क्लबने हरविले.
रोनाल्डोची मागील दोन सामन्यांत अनुपस्थिती४० वर्षीय रोनाल्डो पोर्तुगाल संघाचा हुकमी खेळाडू असून, पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यास इच्छुक आहे. सौदी अरेबियातील अल नासर क्लबशी तो २०२७ पर्यंत करारबद्ध आहे. या क्लबच्या बाहेरगावच्या सामन्यात रोनाल्डो आपल्या मर्जीनुसार खेळू शकतो या अटीचा करारात समावेश आहे. एएफसी चॅम्पियन्स लीग २ स्पर्धेत अल नासर क्लबने आपले ड गटातील दोन्ही सामने जिंकले आहेत, मात्र या लढतींत रोनाल्डो खेळला नव्हता.
अल झावरा क्लबविरुद्धच्या लढतीसाठी तो इराकला गेला नव्हता, तसेच ताजिकिस्तानविरुद्धच्या एफसी इस्तिक्लोलविरुद्धच्या घरच्या मैदानावरील सामन्यातही तो खेळला नव्हता, मात्र अल नासर क्लबतर्फे सौदी प्रो लीगमध्ये तो सध्या खेळत असून पाच सामन्यांत त्याने पाच गोल नोंदविले आहेत. तो नुकताच हंगेरीविरुद्धच्या विश्वकरंडक पात्रता फेरी लढतीत पोर्तुगाल संघातून खेळला होता, बरोबरीत राहिलेल्या या लढतीत संघाचे दोन्ही गोल रोनाल्डोनेच नोंदविले.