Mohammad Mustafa : शेवटी मुलगा हा…सूनेसोबतच्या संबंधांच्या आरोपावर माजी DGP काय म्हणाले?
Tv9 Marathi October 23, 2025 12:45 AM

“मुलाचं दु:ख केवळ एक पिता समजू शकतो. पण तोच मुलगा हे जग सोडून गेला, तर होणारं दु:ख अकल्पनीय असतं” पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी एकुलत्यात एक मुलाच्या मृत्यूवर आपल्या भावना व्यक्त केल्या. मागच्या 18 वर्षांपासून सुरु असलेला कौटुंबिक संघर्षावर मोकळेपणाने व्यक्त झाले. “बघा, एका मुलाच्या मृत्यूच दु:ख केवळ ज्याला मुलगा आहे, तोच समजू शकतो. माझा एकुलता एक मुलगा 35 वर्षांचा होता. इतक्या मोठ्या दु:खामुळे मी मागचे सहा-सात दिवस कोणाचा कॉल रिसीव केला नाही. कुठल्या मोठ्या नेत्याचा किंवा अधिकाऱ्याचा फोन रिसीव केला नाही. मी फक्त माझ्या मुलाच्या आठवणीत आणि त्या धक्क्यामध्ये होतो. काही लोकांनी माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. पण मी घाबरणारा नाही. मी आता माझ्या मनातला पिता आणि सैनिक जागा केला आहे. सत्य सर्वांसमोर येईल” असं मोहम्मद मुस्तफा म्हणाले.

मागच्या 18 वर्षांपासून मुलाला ड्रग्जच व्यसन लागलेलं, तो इतिहास मुस्तफा यांनी सांगितला. “2006 साली माझ्या मुलाने शाळेत असताना सॉफ्ट ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. नंतर हेरॉईन आणि अखेरीस 2024 मध्ये तो आईस पर्यंत पोहोचला. मनालीमध्ये एसिडच्या प्रयोगाने त्याच्या मेंदूच आणि शरीराच नुकसान झालं. त्याने अनेकदा सुधारण्याचा प्रयत्न केला. पण मानसिक आणि शारीरिक अडथळ्यांनी त्याला प्रत्येकवेळी मागे ढकललं. मुलाच्या मानसिक स्थितीमधून कधी-कधी सायकॉटिक लक्षण दिसून यायची. वास्तवात जे घडलेलं नाही, अशा गोष्टी त्याच्या डोक्यात घडायच्या. ही फक्त ड्रग्सची सवय नाही, तर मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक संघर्षाची सुद्धा गोष्ट आहे” असं मुस्तफाम्हणाले.

माझ्या कुटुंबाच चरित्र खूप मोठं

मुस्तफा यांनी घरात घडलेल्या खतरनाक आणि दु:खद घटनांवर खुलासा केला. “2019 साली मुलाने एकदा खोलीत आग लावलेली. एकदा सुनेला खोलीत बंद केलेलं. अनेकदा स्टाफ आणि कुटुंबासोबत हिंसक वर्तन केलं. मात्र, तरीही कुटुंबाने नेहमीच मुलावर प्रेम केलं, त्याला सहानुभूती दाखवली”

मुलाने चुका करुनही आम्ही त्याला समजून घेतलं

“माझी बायको 25 वर्षांपासून राजकारणात आहे. तिने नेहमी सत्य आणि न्यायाला साथ दिली आहे. माझी मुलगी आणि सून यांचं चरित्र प्रत्येक आई-बापासाठी आदर्श आहे. माझ्या मुलाने चुका करुनही आम्ही त्याला समजून घेतलं. त्याचं पालनपोषण केलं. मुलगा मुलगा असतो, त्याची प्रत्येक चूक माफ असते” असं मुस्तफा म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.