दिवाळी सणावर दिबांची छाप
विमानतळ नामकरणासाठी आकाशकंदिलातून जनजागृती
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) ः नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नावाकडे लक्ष वेधण्यासाठी कोपरखैरणेमधील स्पॉट बॉईज ग्रुपने दिबांच्या नावाचा आकाशकंदील उभारला आहे.
नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरात विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. याच अनुषंगाने कोपरखैरणे गावात स्थानिकांकडून दिवाळीसणाचे औचित्य साधताना लावलेला आकाशकंदील आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विमानतळाची प्रतिकृती असलेला हा कंदील स्पॉट बॉईजमधील सर्व सभासदांनी साकार केला आहे. या कंदिलांची मूळ संकल्पना रंजित पाटील, अविनाश पाटील यांची आहे. गेल्या वर्षीही रतन टाटा यांच्या फोटोचा कंदील उभारण्यात आला होता. त्यापूर्वी विश्वचषकाच्या प्रतिकृतीचा कंदील उभारण्यात आला होता.