पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणखी एक पुस्तक आलं आहे. ‘मोदीज मिशन’ असं या पुस्तकाचं नाव आहे. प्रसिद्ध वकील बर्जिस देसाई यांनी हे पुस्तक लिहिलं असून रुपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असाधारण व्यक्तिगत प्रवास रेखाटण्यात आला आहे. वडनगरमधील बालपण ते पंतप्रधान होण्यापर्यंतची ही कहाणी आहे. पण त्याही पेक्षा हे सरळधोपट अर्थाने आत्मचरित्र नाहीये, तर ही विचारांची गोष्ट आहे. त्यामुळे हे पुस्तक अत्यंत वेगळ्या धाटणीचं झालं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या 24 ऑक्टोबर रोजी या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.
‘मोदीज मिशन’ हे काही लौकीकार्थाने आत्मचरित्र नाही. ही एका विचाराची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांनी असंख्य अडचणी आणि आव्हानांचा सामना करत राष्ट्रीय जागरणाचा होम पेटवत ठेवला. त्याची ही गोष्ट आहे. मोदींचं बालपण आणि त्यांचे तरुणपणातील अनुभवही या पुस्तकात आहेत. तसेच त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि शासनाबाबतचा दृष्टीकोण यावरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आल्याचं बर्जिस देसाई यांनी सांगितलं.
खोटा प्रचार खोडून काढला
देशातील एका वर्गाद्वारे मोदींबाबतचा खोटा प्रचार करण्यात आला आहे. देशात सुशासन निर्माण करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न सुरू केले, त्याला अडथळा करण्याचा आणि नागरिकांचं लक्ष विचलित करण्याचा या खोडसाळ प्रचारा मागचा हेतू होता. हा प्रचार खोडून काढण्याचं कामही या पुस्तकातून करण्यात आलं आहे. मोदींनी देशाच्या सामूहिक चेतनेला कशा पद्धतीने अत्युच्च शिखरावर नेलं, तसेच कारभारात पारदर्शिकता आणून सुशासन निर्मितीचा कसा प्रयत्न केला, हे सुद्धा या पुस्तकात रेखाटण्यात आलं आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या औपचारिकरणापासून ते अनुच्छेद 370 रद्द करण्यापर्यंत, भारताची दिशा बदलणाऱ्या मोदींच्या योजनाबद्ध निर्णयावर या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. देशात कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी मोदींच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा मागोवाही या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
लेखकाविषयी…
पुस्तकाचे लेखक बर्जिस देसाई हे मुंबईतील एक वकील आणि लेखक आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका गुजराती दैनिकातून पत्रकार म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी भारतातील प्रमुख लॉ फॉर्ममध्ये प्रवेश केला. त्यांनी या पूर्वी पारसी संस्कृतीवर आधारित ‘Oh! Those Parsis’ आणि ‘The Bawaji’ ही दोन पुस्तकेही लिहिली आहे. पारसी संस्कृतीचा अनोखा ठेवा म्हणून या पुस्तकांकडे पाहिलं जातं.
आनंद महिंद्रा काय म्हणाले?
या पुस्तकावर आनंद महिंद्रा यांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातील सर्वात चर्चित नेत्यांपैकी एक आहेत. या पुस्तकातून मोदींचं देशावरचं प्रेम, जागतिक स्तरावर देशाचं नाव उज्जवल करण्यासाठी त्यांनी सुरू केलेले प्रयत्न, यावर या पुस्तकातून भाष्य करण्यात आलं आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय.