चोरीच्या तुम्ही खूप कथा ऐकल्या असतील, पण आज ज्या चोरीबद्दल बोलत आहोत, ती चोरी जगातील सर्वात वेगवान चोरी होती, अवघ्या चार मिनिटांमध्ये चोरांनी कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरांनी अवघ्या चार मिनिटांमध्ये 102 मिलियन डॉलर जवळपास 8,950,127,904 अब्ज रुपयांचे दागिने लंपास केले होते. चला तर मग जाणून घेऊयात ही चोरी नेमकी कशी झाली होती त्याबद्दल?
ही चोरी पॅरिसच्या लॉवरे म्युझियमध्ये झाली, रविवारचा दिवस होता, चार चोर पिवळे जाकेट घालून म्युझियमध्ये घुसले आणि अवघ्या चार मिनिटांमध्ये मौल्यवान दागिन्यांची चोरी करून फरार झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या म्युझियमभोवती प्रचंड आणि जबरदस्त अशी सुरक्षा व्यवस्था होती, फुट फुटांवर सुरक्षा रक्षक तैनात होते, एवढ्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात हे चोरटे यशस्वी झाले. म्युझियमध्ये घुसून चोरी करेपर्यंत या चोरट्यांना अवघ्या पाच मिनिटांचा वेळ लागला.
ज्या दागिन्यांची चोरी झाली त्यामध्ये 19 व्या शतकातील मौल्यवान दागिन्यांचा समावेश होता. यामध्ये अनेक हिरे, पाचूच्या माळा, दोन ताज आणि नीलमणी हार यांचा समावेश होता. हे दागिने फ्रान्सच्या शाही कुटुंबाची शान होते. 1887 मध्ये सरकारने शाही कुटुंबातील अनेक दागिन्यांचा लिलाव केला, मात्र जे दागिने चोरी झाले होते, त्यांचा लिलाव न करता त्यांना सुरक्षित जागी ठेवण्यात आलं होतं, कारण हे दागिने फ्रान्सच्या संस्कृतीचा अमूल्य असा ठेवा होते.
कशी झाली चोरी
रविवारी सकाळी अंदाजे साडेनऊ वाजता हे म्युझियम सामान्य लोकांसाठी ओपन झालं, त्यानंतर अवघ्या काही वेळेतच ही चोरीची घटना घडली. फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट नुनेज यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार चोर होते. त्यांनी एका ट्रकवर एक क्रेन ठेवलं होतं. क्रेनच्या मदतीने त्यांनी म्युझियमच्या खिडकीची काच फोडली आणि खिडकीमधून म्युझियमच्या थेट गॅलरीमध्ये प्रवेश केला. तिथे ठेवण्यात आलेल्या काचेच्या बॉक्सला त्यांनी तोडलं आणि दागिने घेऊन ते फरार झाले. ही जगातील सर्वात मोठी चोरी मानली जात आहे.