जनता दरबारात अवैध बांधकामांच्या तक्रारी
मंगलप्रभात लोढा यांचे कारवाईचे निर्देश
मुंबई, ता. २३ : मालाड-मालवणी परिसरातील रोहिंग्या बांगलादेशींची घुसखोरी, गुंडगिरी, अमली पदार्थ सेवन व तळीरामांचा वाढता उपद्रव, सरकारी जागांवर अतिक्रमण, यासारख्या अनेक गंभीर समस्या स्थानिक नागरिकांकडून कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पी उत्तर विभागाच्या जनता दरबारात मांडण्यात आल्या.
या परिसरात १० हजार अवैध बांधकामे आणि घरे असल्याचे एका अहवालाच्या माध्यमातून समोर आले. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यासाठी लोढा यांनी स्वतः लक्ष घातले असून, याबाबत एक बैठकसुद्धा बोलावण्यात आलेली आहे.
मालवणी परिसरात २० पेक्षा जास्त अंगणवाड्या असून, या बहुतांश अगणवाड्यांवर अतिक्रमण करण्यात आले असल्याची तक्रार नागरिकांनी केली. याबाबत तीव्र नाराजी प्रकट करत पोलिस प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन हे अतिक्रमण हटवावे, यासाठीचे निर्देशसुद्धा मंत्री लोढा यांनी दिले. कांदळवन तोडून तिथे केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष कसे होते, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. या समस्येची दखल घेत लोढा यांनी तत्काळ समितीचे गठन करून त्या समितीने परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. या अहवालाच्या आधारे त्वरित पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, असेदेखील त्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेता त्यांचे परवाने १५ दिवसांसाठी रद्द करावे, असे निर्देशही लोढा यांनी पोलिसांना दिले.