अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चार वर्षांनंतर आता सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे. रियाने सुशांतला बेकायदेशीर पद्धतीने धमकावलं किंवा आत्महत्येला प्रवृत्त केलं हे सिद्ध करणारे कोणेच पुरावे मिळाले नाहीत, असं सीबीआयने स्पष्ट केलं. परंतु सुशांतच्या कुटुंबीयांनी या क्लोजर रिपोर्टवर नाराजी व्यक्त केली आहे. हा रिपोर्ट अर्धवट आहे आणि त्यात सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचल्यानंतर सुशांतने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. 14 जून 2020 रोजी तो मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने यावर्षी मार्च महिन्यात दोन क्लोजर रिपोर्ट दाखल केले होते. यापैकी एक क्लोजर रिपोर्ट त्या केसचा आहे, जो सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटण्यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर दुसरा खटला खुद्द रियाने सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबईत दाखल केला होता.
सीबीआयच्या तपासात हे स्पष्ट झालं होतं की रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीने 8 जून 2020 रोजी सुशांतचं घर सोडलं होतं. त्यानंतर 14 जूनपर्यंत ते त्याच्या घरी गेले नव्हते. यादरम्यान त्यांनी सुशांतशी संपर्कही साधला नव्हता. रिपोर्टनुसार, सुशांतची बहीण मीतू सिंह 8 जूनपासून 12 जूनपर्यंत त्याच्यासोबत होती. रियावर आर्थिक फसवणुकीचाही आरोप करण्यात आला होता. परंतु सीबीआयने या आरोपांनाही फेटाळलं आहे.
तपासात समोर आलं की जेव्हा रिया सुशांतच्या घरातून निघाली, तेव्हा तिने फक्त स्वत:चा लॅपटॉप आणि घड्याळ नेलं होतं. या दोन्ही गोष्टी सुशांतने तिला भेटवस्तू म्हणून दिल्या होत्या. सुशांत रियाला त्याच्या कुटुंबाचा एक भाग मानत होता आणि म्हणूनच तिच्या खर्चाचं वर्गीकरण फसवणूक म्हणून केलं जाऊ शकत नाही, असं सीबीआयने म्हटलंय. सुशांतचे सर्व आर्थिक व्यवहार त्याचे चार्टर्ड अकाऊंटंट आणि वकील हाताळत होते. रिया किंवा इतर कोणत्याही आरोपीविरुद्ध असे कोणतेही पुरावे आढळले नाहीत, ज्यावरून त्यांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केलं हे सिद्ध होईल, असंही सीबीआयने म्हटलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर पुढील निर्णय घेतला जाईल.