दिवाळीची मंगलमय सांगता
नवी मुंबईत भाऊबीज, पाडवा उत्साहात साजरा
वाशी, ता. २३ (बातमीदार) : बहीण-भावाच्या स्नेहबंधाचा आणि पती-पत्नीच्या सहजीवनाचा उत्सव असलेले भाऊबीज, दिवाळी पाडवा नवी मुंबईत उत्साह, प्रेम आणि पारंपरिक वातावरणात साजरे करण्यात आले. या सणांमधून दिवाळी सणाची मंगलमय सांगता झाली.
भाऊबीजेच्या दिवशी घराघरांत चैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळाले. बहिणींनी प्रेमपूर्वक भावाचे औक्षण करून भावाच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या, तर भावांनी बहिणींना ओवाळणी देऊन त्यांच्या आनंदाची जबाबदारी स्वीकारली. चिमुकल्या भावंडांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पारंपरिक पोशाख परिधान करून सणाचा उत्साहाने आनंद घेतला. रांगोळीने सजवलेल्या पाटावर औक्षणाच्या पारंपरिक विधींचे दर्शन घडले. ओवाळणीसाठी साडी, दागिने, मोबाईल फोन आणि गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या. सोन्याच्या दागिन्यांपासून ते भेटवस्तूपर्यंत सर्वच ठिकाणी खरेदीचा उत्साह दिसून आला. दिवाळी पाडवा, जो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, बुधवारी श्रद्धा आणि आनंदाने साजरा झाला. या दिवशी पत्नींनी पतीचे औक्षण करून त्याच्या सुख, समृद्धी, आरोग्याची कामना केली. अनेक जोडप्यांनी एकत्र भोजन, सहली आणि कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत केले. व्यापारीवर्गानेही पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘वहीपूजन’ केले. शहरातील दुकाने, व्यापारी संकुले आणि बाजारपेठा आकर्षक रोषणाईने उजळल्या होत्या. फटाक्यांची आतषबाजी आणि सजावटीच्या दिव्यांनी सणाची शोभा अधिक खुलवली.
--------------------------
गझलांच्या सुरांनी भारावली सकाळ
वाशी येथे झालेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात पारंपरिक संगीत, भजन आणि गझलांच्या सुरांनी सकाळ भारावली. कार्यक्रमानंतर सामूहिक फराळाचा आस्वाद घेत नागरिकांनी सणाचा आनंद द्विगुणित केला. भाऊबीज आणि पाडवा या दोन सणांनी नवी मुंबईतील नागरिकांच्या आयुष्यात कौटुंबिक एकता, प्रेम आणि आनंदाचा सुवर्णस्पर्श देत दिवाळी सणाची सुंदर सांगता केली.