ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने पाडवा
कल्याण, ता. २३ (बातमीदार) : श्री मलंगगड विभाग, शेलारपाडा, भाल, रायतेसह ग्रामीण भागातील अनेक गावांत पारंपरिक उत्साहात बलिप्रतिपदा पाडव्याचा सण साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी हा सण पारंपरिक रूढीनुसार साजरा केला. शेलारपाड्यात सकाळपासूनच गावातील शेतकरी आणि युवकांनी बैलांना पारंपरिकपणे सजवले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामीण परंपरेनुसार गवताच्या पेंढ्या जाळत त्यावरून बैलांना उडवून सणाची सांगता केली. याप्रसंगी गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
बलिप्रतिपदेला ग्रामीण भागात जनावरे उडवण्याची म्हणजेच पळवण्याची पूर्वापार सुरू असलेली प्रथा आहे. या प्रथेमागे पारंपरिक आणि शास्त्रीय दोन्ही कारणे आहेत. बलिप्रतिपदाच्या दिवशी, शेतकरी त्यांच्या बैलांना स्वच्छ अंघोळ घालून, त्यांना रंगवून, सुंदर सजवून घेतात. त्यानंतर गावात वेशीवर भाताच्या पेंड्याला आग लावतात. या नाजूक आगीवरून बैलांना पळवले जाते. आगीचा धूर आणि उष्णतेचा सौम्य स्पर्श बैलांच्या अंगावरील जीवाणू किंवा किडी नष्ट करतो आणि बैलांना उत्साह व चैतन्य मिळते. तसेच, या कृत्यामुळे बैलांच्या मनात आगी व धुराबद्दल भीती तयार होते, ज्यामुळे रानावनात कधी वणवा लागल्यास बैल सैरभैर होत नाहीत. या प्रथेमुळे बैलांचे आरोग्य सुधारते आणि ते पुन्हा शेती करण्यासाठी चैतन्यवान होतात, असे सांगण्यात येते. या प्रथेला शेतकरी व ग्रामीण भागातील लोक शास्त्रीयदृष्ट्या उपयुक्त मानतात, तर हा सण शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील कृतज्ञतेचा, स्वास्थ्य व उत्साह वाढवण्याचा आणि शेतकरी संस्कृतीशी जोडलेला महत्त्वाचा भाग मानला जातो.