विजेचा खांब कोसळून मोठी हानी
esakal October 25, 2025 07:45 AM

00232

विजेचा खांब कोसळून मोठी हानी

रोणापाल-देऊळवाडीत मांगराचे नुकसान, अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः रोणापाल - देऊळवाडी येथे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुसळधार पावसात विजेचा खांब मांगरावर पडून नुकसान झाले. दरम्यान रस्त्यावर वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला. ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे तसेच महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर दुर्घटना घडल्याचा आरोप रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर यांनी केला आहे.
रोणापाल परिसराला काल (ता.२३) मुसळधार पावसाने झोडपले. रोणापाल-देऊळवाडी येथे देऊलकर कुटुंबीयांच्या घरासमोरील विजेचा खांब कोसळून तो मांगरावर पडल्याने मांगराच्या छप्पराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मांगरात कापणी केलेले भातही भिजल्याने भाताचे नुकसान झाले. बांदा सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर यांना स्थानिकांनी जाब विचारला. महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोपही स्थानिकांनी केला. विजेचा खांब योग्य प्रमाणात जमिनीत पुरलेला नव्हता. याबाबत उदय देऊलकर यांनी संबंधित ठेकेदाराला पूर्वकल्पना दिली होती. मात्र, ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केला.
वीज खांब कोसळल्यानंतर वीज पुरवठा बंद करण्यासाठी अधिकारी व वीज कर्मचाऱ्यांना फोन केला असता तो उचलला नसल्याचे श्री. देऊलकर यांनी सांगितले. अशावेळी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. असा प्रकार महावितरण अधिकाऱ्यांकडून वारंवार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.