आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 26 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांत पॉइंट्स टेबलमधील पहिल्या स्थानासाठी जोरदार चुरस आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याआधी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 2 महिला खेळाडूंनी त्यांची छेड काढण्यात आल्याचा आरोप केला आहे.
इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हॉटेलमधून कॅफेमध्ये जात होते. या दरम्यान कथित छेडछाड करण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सेक्युरिटी मॅनेजर डॅनी सिमन्स यांनी 23 ऑक्टोबरला स्थानिक एमआयजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली. या आरोपीचं नाव अकील असं आहे.
ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये थांबली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 23 ऑक्टोबरला सकाळी खजराना रोड परिसरातून आरोपी अकील खान याला अटक करण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही महिला खेळाडू हॉटेलमधून कॅफेच्या दिशेने जात होत्या. तेव्हा अकीलने या दोघींचा बाईकवरुन पाठलाग केला. त्यानंतर अकीलने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करुन पळ काढल्याचं या महिला क्रिकेटपटुंनी म्हटलं. त्यानंतर खेळाडूंनी टीमच्या सेक्युरिटी ऑफिसर डॅनी सिमन्स यांना माहिती दिली. त्यानंतर सिमन्स यांनी सुरक्षा यंत्रणांसह संपर्क साधला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले, अशी माहिती पीएसआय निधी रघुवंशी यांनी दिली.
त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त हिमानी मिश्रा यांनी दोन्ही खेळाडूंसह संवाद साधला. त्यांच्यासोबत नक्की काय झालं? याचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर एमआयजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
“जेव्हा हा सर्व प्रकार घडला तेव्हा एकाने त्या आरोपीच्या बाईकचा नंबर लिहून घेतला. त्यावरुन अकीलला अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणात सखोल चौकशी केली जात आहे”, अशी माहिती हिमानी मिश्रा यांनी दिली.