वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 26व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. तसं तर या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. मात्र टॉपला राहण्याची संधी या दोन्ही संघांकडे आहे. त्यामुळे या सामन्यातील विजयी संघाचा उपांत्य फेरीतील सामना भारताशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार ताहलिया मॅक्ग्रा म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. हे मैदान धावांचा पाठलाग करण्यासारखे आहे. प्रकाशात फलंदाजी करणे थोडे सोपे वाटते. आपण प्रत्येक सामन्याचा आढावा घेतो, त्यात काही लहान बदल करावे लागतात, त्यामुळे आज ते योग्यरित्या करणे आणि उपांत्य फेरीपूर्वी गती आणणे चांगले होईल.’
दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हीने सांगितलं की, ‘आज चांगल्या प्रकारच्या गोष्टी होतील अशी आशा आहे. आमच्या संघात दोन बदल आहेत. नॅडिन डी क्लार्क परत आली आहे आणि मसाबाटा क्लास संघात आहे. दोन्ही बदल आमच्यासाठी आजचा दिवस खास बनवतील. मला वाटत नाही की आम्ही यापूर्वी कधीही विश्वचषकाच्या कोणत्याही स्वरूपात गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आज आमच्यासाठी जगातील सर्वोत्तम संघांपैकी एकाविरुद्ध आमचे कौशल्य तपासण्याची ही एक अद्भुत संधी आहे.’ आजच्या स्पर्धेतील विजेता नवी मुंबई येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध खेळेल.
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, स्युने लुस, ॲनेरी डेर्कसेन, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लार्क, मसाबता क्लास, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.
ऑस्ट्रेलिया महिला (खेळणारा संघ): जॉर्जिया वोल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, बेथ मूनी (विकेटकीपर), अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.