मोहोळ-धंगेकरांसह महायुतीचे नेते आपापसात का भिडत आहेत? अंतर्गत वादांची कारणं काय?
BBC Marathi October 25, 2025 11:45 PM
Facebook/murlidharmohol & Ravindra Dhangekar मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर

धंगेकर विरुद्ध मोहोळ, गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे, मेधा कुलकर्णी विरुद्ध रुपाली पाटील, अजित पवार विरुद्ध मोहोळ...

गेल्या काही महिन्यांमध्ये महायुतीत एकमेकांसमोर आलेल्या मित्रपक्षांमधल्या नेत्यांची ही काही उदाहरणं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजू लागले आणि त्यातच महायुतीतल्या नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडायला लागल्या.

पण हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे? की यामागे आणखी काही डावपेच आहेत? आणि अशी भांडणं सुरू असताना महायुतीतले नेते निवडणुकीला सामोरे जाणार कसे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महायुतीत काय घडलं?

शिवसेना फुटल्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि स्थानिक पातळीवरही शिंदेसोबत गेलेले नेते भाजपसोबत जुळवून घेताना दिसू लागले.

विधानसभा निवडणुका होता होता राष्ट्रवादी फुटून अजित पवारही सोबत आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन झालं.

"आम्ही एकत्र आहोत," असं हे नेते सांगत असतानाच काही ना काही कारणाने धुसफूस होताना दिसत होतीच.

पण तरीही नेत्यांच्या निमित्ताने कार्यकर्तेही एकत्र येत असल्याचं चित्र समोर तरी दिसत होतं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होईल, असे अंदाज वर्तवले जात होते.

Facebook/Ravindra Dhangekar पुण्यातील काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ यायला लागल्या तसं मात्र, हे चित्र पालटताना दिसत आहे.

राज्यात 2012 पर्यंत मुंबईच शिवसेना, पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पुणे पॅटर्नचा अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असं समीकरण होतं. पण, गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये हे समीकरण बदलताना दिसलं.

मुंबई शिवसेनेकडं असली तरी तिथे फुटीनंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपचा प्रभाव निर्माण झाला.

तर ठाण्याचा गड शिंदेंच्या ताब्यात राहिला. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने मोठी आघाडी मिळवली.

महायुतीमध्ये या बालेकिल्ल्यांमध्येच या पक्षांना आव्हान निर्माण होताना दिसत आहे. याची एका अर्थाने सुरुवात झाली ती शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातूनच.

नाईक विरुद्ध शिंदे

गणेश नाईकांनी सुरू केलेला जनता दरबार शिवसेनेच्या नेत्यांना खटकला आणि त्यावरून समांतर सत्ताकेंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.

हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला. मात्र त्यावर पांघरूण पडलं नाही. कधी वक्तव्य तर कधी कार्यक्रम या माध्यमातून नाईक विरुद्ध शिंदे असा संघर्ष ठाण्यात उभा राहताना दिसत आहे.

मात्र त्याचे तेवढे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत नव्हते.

FACEBOOK/GANESH NAIK & SHIVSENA गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे

राज्याच्या राजकारणावर त्याचे थेट पडसाद दिसत नसले तरी ठाण्यावर आपली सत्ता राखण्यासाठी शिंदेंसाठी युतीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार होता. त्यामुळेच शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा होती.

पण पुण्यात सुरू झालेल्या वादांमुळे तर आता महायुतीतले तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत का? असा प्रश्न उपस्थित करणारं चित्र निर्माण झालं आहे.

मोहोळ विरुद्ध धंगेकर

गुंड नीलेश घायवळच्या पासपोर्टचं प्रकरण समोर आलं आणि त्यानिमित्ताने मध्यंतरी बराच काळ शांत असणारे रवींद्र धंगेकर चंद्रकांत पाटलांवर आरोप करताना दिसले.

पाठोपाठ मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगच्या व्यवहाराच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर राजू शेट्टींनी आरोप केले त्यातही धंगेकर उतरले.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी रोज एक पोस्ट असं करत आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली.

मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची बाजू मांडताना बोर्डिंग-संबंधित व्यवहार हे आपण या संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर झाल्याचं स्पष्ट केलं.

पण पाठोपाठ धंगेकरांनी मोहोळ हे आणखी एका बिल्डरची गाडी महापौर पदाच्या कालावधीत वापरत असल्याचं म्हटलं. यानंतर शिंदे गटातून धंगेकरांची हकालपट्टी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांना तंबी दिल्याचंही सांगितलं गेलं.

RRPSpeaks/X मुरलीधर मोहोळ यांनी आपली बाजू मांडताना बोर्डिंग-संबंधित व्यवहार हे आपण या संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

धंगेकर मात्र आपल्या आरोपांवर ठाम असलेले दिसतात. बीबीसी मराठीशी बोलताना धंगेकर म्हणाले, "मी शिंदेंनी सांगितलेल्या लाईनवरच काम करत आहे. त्यांनी गुन्हेगारीचा विरोध केला आहे. मी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहे."

दरम्यान, या आरोपानंतर भाजपकडून धंगेकरांवरच त्यांच्यावर जमीन हडपण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली.

धंगेकरांनी केलेले आरोप आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याच्या निमित्ताने बोलताना मोहोळ म्हणाले, "रोज सकाळी ते बोगस ट्वीट करतात आणि माध्यमं ते दाखवतात. गाडीबाबत मी महापालिकेची गाडी वापरली नाही हे निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातही लिहिलं आहे.

मी स्वतःची गाडी आणि इंधन वापरलं. पुण्याला स्वतःची गाडी वापरणारा महापौर मिळाला. वैयक्तिक आकसातून आरोप केले जात आहेत. त्यांच्यावर (धंगेकरांवर) 2011 मध्ये जमीन हडपली म्हणून गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर 10 गुन्हे आहेत, माझ्यावर एकही नाही."

धंगेकरांनी मात्र आपल्यावर एकही गुन्हा नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, "माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होता. तो पोलिसांनीच मागे घेतला. मी पोस्ट करत राहणार आहे. माझ्याकडे पुराव्यांची मालिका आहे."

मेधा कुलकर्णी विरुद्ध रुपाली पाटील

एकीकडे हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शनिवार वाड्यात नमाज पढली गेल्याचा आरोप भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी केला.

त्यापाठोपाठ शनिवार वाड्यात जात 'शुद्धिकरण'ही केलं. इथे त्यांना आव्हान दिलं ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी.

Nitin Nagarkar मेधा कुलकर्णी आणि रुपाली पाटील

रुपाली पाटील यांनी शनिवार वाड्यासमोर कुलकर्णींच्या विरोधात आंदोलन करतानाच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. याच रुपाली पाटील भाऊबीजेच्या निमित्ताने रविंद्र धंगेकरांना राखी बांधतानाही दिसल्या.

अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ

फक्त स्थानिक नेतेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारही मोहोळांवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. प्रभागरचना मनासारखी झाली नसल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जातंय.

अशातच गणपती विसर्जन मिरवणुकीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांसमोर येणंही टाळलं.

त्यात आता ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीतही हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे आहेत.

निवडणुका की अस्तित्वाची लढाई?

या अंतर्गत खेचाखेचीला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कारणीभूत असल्याचं मत पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मांडतात.

यानिमित्ताने त्या परिसराचा, शहराचा कारभारी कोण हे ठरणार असल्याचं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

ते म्हणाले, "जशी मुंबई महापालिकेत एकत्र आणि इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा झाली, तशी कटुता वाढायला लागली. नवी मुंबईत गणेश नाईकांच्या निमित्ताने शिंदे आणि नाईक आमने-सामने दिसले. सोलापूरातही हे दिसलं."

"पुण्यातही तेच सुरू आहे. घटना तात्कालिक असल्या तरी त्याचा संबंध राजकारणाशी जोडावा लागतो. धंगेकरांना लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागला आहे.

महापालिका निवडणुका मैत्रीपूर्ण लढत असेल तर मोहोळ हा चेहरा असतील असं दिसतंय. अशा परिस्थितीत मोहोळ यांच्या इमेजला तडे जाणं हे भाजपला परवडणारं नाही.

तसंच सुरुवातीला धंगेकरांना समज दिली असं चित्र निर्माण केलं गेलं होतं, तसं नाही हे उदय सामंत बोलल्यानंतर स्पष्ट झालं आहे."

Getty Images याला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हीच कारणीभूत असल्याचं मत पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मांडतात.

मेहता यांच्या मते, "या निमित्ताने राष्ट्रवादी देखील उतरलेली दिसते. हे काही मैत्रीपूर्ण लढतीचं चित्र नाही. पायात पाय घालण्याची ही चिन्हं दिसत आहेत. जिल्ह्याचा किंवा शहराचा कारभारी ठरवणारी ही निवडणूक आहे.

त्यात बावनकुळेंसारखे नेते बंडखोरी खपवून घेणार नाहीत. 'फोन सर्व्हिलन्सवर टाकू' असं जाहीरपणे बोलताना दिसतात. 'इनकमिंग चालतंय, आउटगोईंग चालणार नाही' असं दिसतं, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

त्यामुळे ही निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग आहे. त्याचे फटाके आधीच फुटायला लागलेले दिसतात. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर टीका करणार नाहीत. पण स्थानिक पातळीवर मात्र वेगळं चित्र दिसतंय."

BBC विजयाचा आनंद साजरा करताना महायुतीचे नेते

सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांच्या मते, सत्ताधारी पक्षात राहून विरोधी पक्षाची भूमिका माजी आमदार रविंद्र धंगेकर बजावत आहेत.

फडणीस म्हणाले की, "त्यांच्याकडे शिवसेनेची थेट जबाबदारी नाही. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर भूमिका घेतल्याचे ते सांगतात.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध त्यांनी उघडलेली आघाडी व्यक्तिगत पातळीवरची आहे. त्यांनी मांडलेला वेताळ टेकडी बोगद्याचा अथवा जैन वसतीगृह जमिनीचा मुद्दा मोहोळ यांच्याभोवती फिरतो."

सम्राट फडणीस सांगतात की, "2023 च्या पोटनिवडणुकीपासून धंगेकरांचा मोहोळ यांना राजकीय विरोध आहे. तेव्हा धंगेकर 'मनसे'मधून काँग्रेसमध्ये आले होते. आता ते काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. मात्र, आरोपांचा सूर तोच आहे.

मोहोळ यांची राजकीय अडचण होत आहे; मात्र त्याचवेळी भाजप कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, असे चित्र उभे करण्यातही ते यशस्वी होत आहेत.

सध्याच्या आरोपांची तीव्रता धंगेकर किती ताकदीने टिकवून ठेवू शकतात आणि त्यामागे किती जनमत संघटित करू शकतात, हे महत्त्वाचे ठरेल. त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता कमी वाटते. कारण, शिवसेनेच्या इतर नेत्यांनी धंगेकरांचे समर्थन करण्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

पक्षांतर्गत कारवाई झाली, तर ती धंगेकरांच्या पायावर पडेल, अशीही एक शक्यता दिसते. त्यामुळे, आरोप-प्रत्यारोपांची राळ खाली बसल्यावर या विषयांचे खरे स्वरूप समोर येईल, असे वाटते."

Getty Images

"धंगेकरांना आतून पाठिंबा आहे, तोपर्यंत ते काही करणार नाहीत. त्यांच्या अंतर्गत मर्यादेपर्यंतच ते जातात," असे हिंदुस्तान टाईम्सचे मेट्रो एडिटर योगेश जोशी म्हणाले. धंगेकरांची काही प्रमाणात कोंडी झाल्याने ते आपली जागा निर्माण करायचा प्रयत्न करत असल्याचं मतही त्यांनी मांडलं.

त्यांच्या मते, "आता त्यांना वॉर्निंग दिल्याचं सांगितलं जातंय. सेनेत गेल्यानंतरही त्यांना फारसं काही हाती लागलेलं नाही. प्रभागही त्यांच्या सोयीचे नाहीत. त्यामुळे पदाचा वापर करून ते पुढे जाऊ शकले असते, पण त्या दीड वर्षांत फारसं काम दिसलं नाही; आरोप-प्रत्यारोपातच ते अडकून राहिले.

धंगेकरांची काम करण्याची ही पद्धत आहे. ते स्वतःच्या कॅरॅक्टरला जपत आहेत. प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढवत असतो. भाजप मोठा भाऊ म्हणून आहे, पण शिवसेना पुण्यात मोठी नसली तरी तिचे नेते स्वतःची इमेज जपत आहेत. राष्ट्रवादीतही तेच दिसून येतं," असे ते म्हणाले.

"निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. राष्ट्रवादीतही ठरावीक नेते, जसे रुपाली पाटील किंवा अमोल मिटकरी हेच अशा मुद्द्यांवर बोलताना दिसतात.

पक्ष पातळीवर म्हणलं तर ती भूमिका अधिकृत नाही असं म्हणता येईल. या निवडणुकीत बरंच काही 'पणाला' आहे. त्यामुळे सगळेच पक्ष सक्रिय झाले आहेत," असे जोशी यांनी स्पष्ट केले.

राज्यातल्या महायुतीतल्या कागाळ्यांबाबत बोलताना त्यांनी "एकत्र राहणं ही महाविकास आघाडीची आत्ताची अपरिहार्यता" असल्याचं मांडत, महायुती मात्र सत्तेत असल्याने हे सुरू असल्याचं म्हणलं.

जोशी म्हणाले, "राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षांना त्याचा फायदा होताना दिसतो. भाजप आणि शिवसेनेचे नेते कार्यक्रम, किट्स आणि विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. त्यामुळे मविआसाठी अशा वेळी एकत्र राहणं आणि दिसणं अत्यावश्यक आहे. महायुतीत मात्र ते दिसत नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • महाराष्ट्रातल्या 'त्या' 5 मतदारसंघांचा ग्राऊंड रिपोर्ट, जिथे मतदारयाद्यांमध्ये गोंधळाचे आरोप
  • मुस्लीमविरोधी विधानं करणं हा महायुतीत सत्तेचा राजमार्ग झालाय का? विश्लेषक काय सांगतात?
  • 'मंगळसूत्र चोरी'चं प्रकरण नेमकं काय आहे, जे विधानभवन हाणामारीनंतर चर्चेत आलं?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.