महसूल मंत्र्यांच्या बनावट शिक्क्यांचा वापर
esakal October 25, 2025 11:45 PM

महसूल मंत्र्यांच्या बनावट शिक्क्यांचा वापर
डोंबिवली, ता. २५ ः महसूल मंत्री आणि त्यांच्या विशेष कार्य अधिकारी यांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करून एका वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणात बनावट आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, विष्णूनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील मौजे आयरे, कोपर रोडवरील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या शेजारील जमिनीच्या मालकी हक्कावरून महसूल विभागाकडे दावे दाखल आहेत. हे प्रकरण सध्या महसूल मंत्र्यांकडे अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे. या प्रकरणातील अर्जदारांना शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील जमिनीसंदर्भात महसूल मंत्र्यांनी एक आदेश काढल्याची माहिती मिळाली. सुनावणी प्रलंबित असताना आदेश कोणी काढला, असा संशय अर्जदाराला आला. त्यांनी महसूल मंत्री कार्यालयाकडे याबाबत तक्रार केली.

कार्यालयाच्या चौकशीत हा आदेश महसूल मंत्री आणि तेथील विशेष कार्य अधिकारी कुंदनकुमार सोनवणे यांच्या बनावट सही आणि शिक्क्याने काढल्याचे उघड झाले. तसेच, या आदेशाचा क्रमांक महसूल मंत्री कार्यालयाच्या नोंदीशी विसंगत असल्याचेही आढळले. या प्रकारानंतर महसूल मंत्री कार्यालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कल्याणच्या उपविभागीय अधिकाऱ्याला दिले. त्यानुसार, महसूल सहाय्यक लक्ष्मण नांगरे यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.