शाळांना पुन्हा लखपतीची संधी
जव्हार, ता. २४ (बातमीदार) : मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रम लाभदायक ठरत असून, गेल्या दोन वर्षांपासून याद्वारे शाळेचे नामांकन व्हावे म्हणून सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. यंदाही हा उपक्रम राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार आल्याने शाळांना पुन्हा लखपती होण्याची संधी मिळणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांसाठी राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान १ जानेवारी २०२४ पासून सुरू केले आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमातील पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाल्यानंतर सरकारने पुन्हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्याचा संकल्प केला आहे. तसे परिपत्रकही काढण्यात आले आहे. याता शाळांसाठी २०० गुणांचे मूल्यांकन राहणार असून, या अभियानांतर्गत सहभागी शाळांना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय-धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या बुद्धीस प्रोत्साहन देणे, असे या तिसऱ्या टप्प्यातील अभियानाचे उद्दिष्ट आहे. ३ नोव्हेंबर रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होणार आहे. या अभियानाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण होणार आहे.
गुणांकन प्रक्रिया
या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांचे मूल्यांकन व गुणांकनासाठी पायाभूत सुविधा ३८ गुण, शासन ध्येय-धोरण अंमलबजावणी १०१ गुण, शैक्षणिक संपादन ६१ गुण, अशी २०० गुणांची ही स्पर्धा असणार आहे. या अभियानांतर्गत शासनातर्फे तालुकास्तर, जिल्हास्तर व विभाग, राज्यस्तरापर्यंत शाळांना लाखोंची बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती जव्हार पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिली.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाल्यानंतर राज्य सरकारने सुरू केलेला तिसरा टप्पा विद्यार्थी, शिक्षक व पालकांना प्रोत्साहित करणारा आहे.
- विजया टाळकुटे, गटशिक्षणाधिकारी, जव्हार