आता थंडीचा ऋतू सुरू होणार आहे. या ऋतूमध्ये बाळं आणि लहान मुलांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण बदलत्या हवामानामुळे मुलांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. त्यातच सर्दी, खोकला, ताप लहान मुलांना झाल्यास काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. मुलांना बरं वाटावं यासाठी पालक अनेकदा नको त्या चुका करतात ज्यामुळे मुलांचे आरोग्य आणखीनच बिघडते. ( Parents should avoid these mistakes when baby has fever )
थर्मामीटरचा वापर
बालरोगतज्ञ सांगतात की, अनेकदा बाळाच्या अंगाला स्पर्श करून ताप किती आहे याचा अंदाज लावला जातो. मात्र असे करणे चुकीचे आहे. मुलांचा ताप हा नेहमी थर्मामीटरने तपासावा. यामुळे अचूक तापमान कळते आणि उपचार घेण्यासाठी मदत होते.
अँटीबायोटिक्स देणे टाळा
अनेकदा पालक कोणताही विचार न करता घरी असलेली औषधे लहान मुलांना देतात. तसेच अँटीबायोटिक्समुळे ताप कमी होतो असा अनेकांचा समज असतो. मात्र त्याचे लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नेहमी बालरोगतज्ञांचा सल्ला घेऊनच बाळाला औषध द्यावे. तसेच बाळाला एकाच वेळी दोन प्रकारची औषधे देणेही घातक ठरू शकते.
आहार
बालरोगतज्ञांच्या मते, जर तुमच्या लहान मुलाला खाण्याची इच्छा नसेल तर जबरदस्ती खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका. अशा वेळी तुम्ही त्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी ओआरएस, नारळ पाणी किंवा सूप देऊ शकता. जर बाळ ६ महिन्यांचे किंवा त्यापेक्षा लहान असेल तर केवळ आईचे दूध पुरेसे असते.
जंकिल टाळण्यासाठी
मुलांना ताप आल्यावर त्यांना जंक फूड देणे टाळा. यावेळी मुलं हट्टीपणा करतात पण जंक फूडऐवजी हलके अन्न जसे की, उपीट, खिचडी, सूप द्यावे.
स्पंजिंग
ताप आल्यावर बाळांना कोमट पाण्याने स्पंजिंग करावे. यासाठी थंड पाण्याचा वापर करू नये. तसेच केवळ कपाळ नाही तर मान, पोट, पाठ आणि मांड्यांवरही पाण्याची पट्टी ठेवावी.
कपडे
यावेळी तुमच्या मुलांना हलके, सुती कपडे घाला. जास्त जाड कापडाने शरीरातील उष्णता लवकर बाहेर पडत नाही. याशिवाय जर मुलांना वारंवार उलट्या, जुलाब, पुरळ, डिहायड्रेशनचा त्रास होत असेल आणि त्यांचा ताप जास्तच असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.