बुद्धविहारासाठी 27 ला बौद्धसमाजाचा भव्य मोर्चा
esakal October 26, 2025 11:45 AM

-rat२४p२६.jpg-
२५O००२१३
रत्नागिरी ः कम्युनिटी सेंटरचे बांधकाम रद्द करावे, या मागणीसाठी आयोजित केलेल्या मोर्चाची माहिती देताना थिबाराजाकालीन बुद्धविहार संघर्ष समितीचे पदाधिकारी.
---
बौद्ध समाजाचा उद्या मोर्चा
संघर्ष समिती; पाच हजार बांधव सहभागी होणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : थिबाकालीन बुद्धविहारासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेत प्रशासनाच्यावतीने होऊ घातलेले कम्युनिटी सेंटरची बांधकाम प्रक्रिया रद्द करावी तसेच थिबाराजाकालीन बुद्धविहाराची राखीव आरक्षित ठेवलेली नोंद पूर्ववत करून ती जागा बौद्ध समाजाला मिळावी, या मागणीसाठी बौद्ध समाजाकडून सोमवारी (ता. २७) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती थिबाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार व कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संघर्ष समितीच्यावतीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी थिबाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष किशोर पवार, प्रकाश पवार, सल्लागार सुनील आंबुलकर, दीपक जाधव, सहसचिव रूपेश कांबळे, प्रसिद्धीप्रमुख केतन पवार आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, मोर्चाची सुरुवात २७ ला सकाळी ११ वाजता थिबाकालीन बुद्धविहार येथून होईल. यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येईल. मार्चामध्ये सुमारे ५ हजार बौद्ध समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. आरक्षित जागेत होऊ घातलेले कम्युनिटी सेंटर हेच बुद्धविहार आहे, असे संबोधून बौद्ध समाजाची प्रशासनाकडून फसवणूक केली जात आहे. कम्युनिटी सेंटरसाठी बौद्ध समाजाचा विरोध नाही; मात्र ते या ऐतिहासिक व विशिष्ट कारणासाठी राखून ठेवलेल्या व ऐतिहासिक बुद्धविहारासाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये नको. लोकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहचाव्यात, यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सावंत यांनी सांगितल़े.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.