महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
esakal October 26, 2025 11:45 AM

महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
डोंबिवली पश्चिमेत शिंदे गट, मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवली, ता. २५ ः आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने डोंबिवलीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. डोंबिवली पश्चिमेतील मनसे, तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा २०० हून अधिक जणांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला बचत गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा, देवीचा पाडा, महाराष्ट्र नगर आणि खंडोबा मंदिर आदी परिसरातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. पश्चिमेकडील मराठा मंडळ सभागृहात भाजपने ‘कार्यकर्ता संवाद आणि पक्षप्रवेश’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्या वेळी हा पक्षप्रवेश झाला.

राजूनगर प्रभागात भाजपची भक्कम ताकद निर्माण करण्यासाठी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने डोंबिवली पश्चिमेतील पक्षप्रवेशाला इच्छुक असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष परब हे कोकणातील असल्याने प्रांतीय संबंधांवर भर देत भाजपने डोंबिवली पश्चिमेत पक्ष विस्ताराचे धोरण अवलंबले असल्याचे म्हटले जात आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी टिप्पणी केली, की डोंबिवली पश्चिमेत गरिबाचा पाडा, राजूनगर परिसरातील काँक्रीट रस्ते आणि गणेशनगर गणेशघाट विकसित करण्यासाठी भाजपने स्थानिकांना सुमारे ५८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा परिस्थितीत कोणी नाहक कुरबुरी करत असेल, तर ते योग्य नाही.

यांचा पक्षप्रवेश
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत देवीचा पाडा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भोईर आणि त्यांचे १०० हून अधिक कार्यकर्ते, शिवसेना (शिंदे गट) उपशाखाप्रमुख संकेत देसाई, मनसेचे काही पदाधिकारी यांनी प्रवेश केला. याशिवाय घे भरारी महिला मंडळ, मित्र परिवार महिला मंडळ, शिवराज मित्र मंडळ, आरंभ मित्र मंडळ, बाल दत्तगुरू मित्र मंडळ, साईनगर मित्र मंडळ यांसह अनेक मंडळे आणि महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

जशास तसे उत्तर देऊ
पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर आपले सामाजिक काम सुरू ठेवावे. यामध्ये कोणी अडथळा आणण्याचा किंवा दहशतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना पहिले समंजसपणे, अन्यथा त्रास वाढला तर जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष परब यांनी दिला.

म्हात्रे यांच्या नाराजीने भाजपची चिंता
राजूनगर प्रभागात भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचे वर्चस्व राहिले आहे; मात्र विकासनिधीच्या वाटपावरून म्हात्रे पक्षातील वरिष्ठांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. ते कोणत्याही क्षणी पक्षाला रामराम ठोकतील, अशी चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यास राजूनगर, गरिबाचा वाडा प्रभागात तेवढ्याच ताकदीचा उमेदवार निवडण्याचे आव्हान भाजपसमोर असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.