पुणे, ता. २५ : आम आदमी पक्षाने (आप) जनतेसाठी रोजगार योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत १० हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. महागाईवर दिलासा आणि सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, अशी माहिती ‘आप’चे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या योजनेत नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराकडे विशेष शैक्षणिक पात्रतेची गरज नाही; फक्त लिहिता-वाचता येणे पुरेसे असेल. पुरुष, महिला, युवक-युवती, सेवानिवृत्त नागरिक आणि बेरोजगारांना या योजनेत सहभागी होता येईल. इच्छुकांनी aappune.org या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे डिजिटल रोजगार कार्ड तयार करायचे आहे. या योजनेत गरजूंना आणि इंटर्नशिप (नोकरीसंबंधित प्रशिक्षण) पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. एका घरातील फक्त एकालाच रोजगार दिला जाणार आहे. या वेळी पक्षाचे अजित मुनोत, महिलाध्यक्षा सुरेखा भोसले, निरंजन अडागळे, प्रशांत कांबळे, किरण कद्रे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.